कोल्हापूर : महापालिकेवर महायुतीचा भगवा ध्वज फडकावण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. रंकभैरव मंदिर दीपमाळा जीर्णोद्धारप्रसंगी ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी महापौर हसीना फरास यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात महायुतीची सत्ता असून एक वर्ष पूर्ण झाले आहे. पुढील चार वर्षेही ही सत्ता कायम राहणार आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधी आणण्याची क्षमता महायुतीकडेच आहे. कोल्हापूर महापालिकेवरही महायुतीची सत्ता येणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. सर्किट बेंच, तीर्थक्षेत्र विकासासह विविध विकासकामांमुळे कोल्हापूर शहर जागतिक नकाशावर येत आहे. हे काम अधिक गतीने पुढे नेण्यासाठी महापालिकेवर महायुतीची सत्ता आवश्यक आहे.
माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी रंकभैरव मंदिराचा आपल्याला अनुभव आहे. रंकभैरवाचा गुलाल एकदा लागला की, विजयाची सुरुवात होते, असा आपला अनुभव असल्याचे सांगितले.यावेळी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, संभाजी देवणे, महेश सावंत, परिक्षित उन्हाळकर, सुनील पाटील, विशाल शिराळकर, अमोल माने आदी उपस्थित होते.
महायुती एकत्र लढणार : आ. राजेश क्षीरसागर
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आ. राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर महापालिकेची निवडणूकही महायुती एकत्रितपणे लढणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. मंत्री मुश्रीफ यांचा महापालिका निवडणुकीचा मोठा अनुभव असून, त्याचा फायदा महायुतीला होईल.