

कोल्हापूर ः कोल्हापूर महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात प्रसिद्ध करण्यात आली. शहरात आता 20 प्रभाग आणि 81 नगरसेवक असणार आहेत. चार सदस्यीय प्रभाग आहेत. 19 प्रभागांतून प्रत्येकी चार, तर शेवटच्या 20 क्रमांकाच्या प्रभागातून 5 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. दरम्यान, 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती नोंदवायच्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, निवडणूक अधिकारी सुधाकर चल्लावाढ यांनी दिली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार, 12 ऑगस्टला ही प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे प्रारूप अंतिम करून बुधवारी प्रसिद्ध केले. प्रभाग रचनेविषयी गेल्या काही महिन्यांपासून शहरात उत्सुकता होती.
प्रभाग रचना करताना प्रभागांना नाव देणे टाळले आहे. नावाऐवजी यापुढे प्रभाग त्याच्या क्रमांकानुसारच ओळखले जातील. नावावरून होणारे वाद टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.