

कोल्हापूर : कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गेल्या 10-12 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी, तसेच अपक्षांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भव्य प्रचार फेऱ्या काढत मतदारांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांचे गजर, घोषणा, झेंडे, फलक आणि समर्थकांची गर्दी, यामुळे संपूर्ण शहरातील गल्लीबोळ अक्षरशः दणाणून गेले. उघड प्रचाराची मुदत संपली असली, तरी आता मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी छुपा प्रचार सुरूच राहणार आहे.
महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचाराचा धुरळा उडत होता. यावेळी प्रचारासाठी कमी कालावधी असल्यामुळे उमेदवारांनी सुरुवातीपासूनच आक्रमक प्रचार सुरू केला होता. दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्यामुळे या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी टोकाचा संघर्ष पाहावयास मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी विविध माध्यमांचा वापर केला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या. या प्रचार फेऱ्यांमुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख चौक, बाजारपेठांसह उपनगरांमधील गल्लीबोळ गजबजले होते. या प्रचार फेऱ्यांमुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठ, गंगावेस, बिंदू चौक यासारख्या भागांतून एकाच वेळी अनेक प्रचार फेऱ्या निघाल्याने वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे वाहनचालकांना प्रतीक्षा करावी लागली. काही ठिकाणी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना बोलावून घेण्यात आले.
प्रचार फेऱ्यांमध्ये स्थानिक नेते, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या हातामध्ये आपापल्या पक्षाचे झेंडे, गळ्यात स्कार्फ आणि डोक्यावर टोप्या, यामुळे शहरातील गल्लीबोळांचे चित्र काहीकाळासाठी विविधरंगी झाले होते. पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न प्रचार फेऱ्यांमध्ये करण्यात येत होता. हलगी, घुमक्यामुळे प्रचार फेऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. प्रचार फेरीत युवकांची आणि ज्येष्ठांचीही लक्षणीय उपस्थिती होती. सणामुळे आजच्या प्रचार फेरीमध्ये महिलांची अनुपस्थिती मात्र जाणवत होती. काही प्रभागांत घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत शेवटच्या क्षणी भावनिक आवाहन करण्यात येत होते.
उघड प्रचाराचा अधिकृत कालावधी संपल्यामुळे आता पडद्यामागील हालचालींना वेग येणार आहे. कार्यकर्त्यांमार्फत मतदारांशी वैयक्तिक संपर्क, फोन कॉल, संदेश आणि सामाजिक संबंधांचा वापर करून मतांची बेरीज करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. स्लिपच्या माध्यमातून निवडणूक चिन्ह घराघरांत पाकिटाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन सुरू झाले आहे. त्याचबरोबर मतदारांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचेही नियोजन करण्यात येत आहे.