

कोल्हापूर : निवडून येईल तो माझा... अशी राजकीय खेळी करून कोल्हापूर महापालिकेवर ताराराणी आघाडीच्या माध्यमातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी एकहाती सत्तेचा झेंडा फडकावला. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केलेली ताराराणी आघाडी पक्षीय राजकारणात बाजूला गेली. सध्या ताराराणी आघाडीचे सर्वेसर्वा महाडिक यांचे सर्व कुटुंब भाजपमध्ये आहे. धनंजय महाडिक भाजपचे खासदार आहेत. अमल महाडिक कोल्हापूर दक्षिणचे भाजपचे आमदार आहेत. शौमिका महाडिक यांनी भाजपकडून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. परिणामी, यंदा महापालिका निवडणुकीत ताराराणी आघाडी थांबणार आणि भाजप लढणार, असे चित्र आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा अपक्षांचे राजकारण बळकट होते. सुरुवातीच्या काळात महादेवराव महाडिक यांनी अपक्षांची मोट बांधून राजकारण सुरू केले. गटा-तटाच्या राजकारणात महाडिक यांनी सत्तेच्या चाव्या आपल्या हाती ठेवल्या. सन 1990 मध्ये महाडिक, कै. पी. एन. पाटील, अरुण नरके यांची आघाडी महापालिकेच्या राजकाणात उतरली. रणरागिणी ताराराणी यांच्या नावाने या तिघांनी आघाडी निर्माण केली. तिघांच्या नावातील एकेक शब्द मिळून त्यांचा उच्चार ‘मनपा’ असा होऊ लागला. त्यानंतर आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार मालोजीराजे हेसुद्धा ताराराणी आघाडीचे घटक बनले. परंतु, ताराराणी आघाडी रजिस्टर नव्हती.
सन 2005 पासून महापालिकेत पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली. तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ व तत्कालीन मंत्री विनय कोरे महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी एकत्र आले. महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ताराराणी आघाडीची सर्व नेतेमंडळी होती. जनसुराज्य व राष्ट्रवादीने चिन्हावर निवडणूक लढविली. परंतु, काँग्रेसपुरस्कृत असूनही ताराराणी आघाडी रजिस्टर नसल्याने अपक्ष म्हणून त्यांचे उमेदवार रणांगणात उतरले. ताराराणी आघाडीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने त्यांनी सत्ता स्थापन केली. अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे सतेज पाटील 2009 मध्ये ताराराणी आघाडीतून बाहेर पडले. मालोजीराजेही अलिप्त राहिले.
2010 मध्ये ताराराणी आघाडी पक्षाचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. महादेवराव महाडिक यांचे पुत्र स्वरूप हे अध्यक्ष बनले. माजी नगरसेवक सुनील मोदी सरचिटणीस झाले. परंतु, 2010 ची महापालिका निवडणूक ताराराणी आघाडी पक्षाच्या वतीने लढविली नाही. शाहू आघाडी आणि अपक्ष मैदानात उतरले. निवडणुकीनंतर काँग्रेसचे सतेज पाटील व राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी हातमिळवणी करून महापालिकेची सत्ता मिळविली. 2015-20 या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ताराराणी आघाडी पक्ष स्वतंत्रपणे रणांगणात उतरला. ताराराणी आघाडीने घवघवीत यश मिळविले.
सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. शहरी पक्ष म्हणून उल्लेख होत असलेला भाजप आता ग्रामीण भागात पोहोचला आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपची सत्ता आहे. सर्वच भागांत भाजपचे कार्यकर्ते आणि पक्षाला मानणारा वर्ग आहे. त्यामुळे ताराराणी आघाडीऐवजी आता भाजपचे सर्व ठिकाणी उमेदवार असणार आहेत.
महापालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागात 3 ते 4 उमेदवार रणांगणात उतरायचे. महापालिकेच्या राजकारणात आल्यापासून निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराला महाडिक यांच्याकडून आर्थिक रसद पुरविली जात होती. त्यामुळे कोणीही निवडून आले तरी तो महाडिक यांच्या गटाचाच मानला जात होता. परिणामी, महाडिकांचीच महापालिकेवर सत्ता चालत होती. निवडून येणार्या अपक्षांची अशाप्रकारे मोट बांधून महाडिक यांनी जिल्ह्याचे राजकारण आपल्या हातात ठेवले.
अपक्षांची मोट बांधून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सत्तेच्या चाव्या हातात ठेवल्या. कालांतराने ताराराणी आघाडीच्या नावावर जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांत आघाडीचे सदस्य होते. काँग्रेसचे महाडिक यांनी आघाडीच्या जीवावर विधान परिषदेची आमदारकी मिळवली. तब्बल 18 वर्षे ते जिल्ह्यातून विधान परिषदेचे आमदार होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ताराराणी आघाडी कार्यरत होती. कालांतराने राजकीय समीकरणे बदलली. तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे महाडिक यांनी 29 सप्टेंबर 2010 मध्ये ताराराणी आघाडी काँग्रेसमध्ये विलीन केली. मात्र, पुन्हा नंतर पक्षीय राजकारणात ताराराणी आघाडी पक्ष स्थापन केला. आघाडीने सुरुवातीपासूनच सामान्य कार्यकर्त्यांना महापौरपदासह इतर पदांची संधी दिली.
2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान न पडणार्या भागात किंवा इतरत्र ताराराणी आघाडीचे उमेदवार मैदानात उतरवण्यात आले. त्याचा भाजपला इतका फायदा झाला की, भाजपने महापालिकेच्या राजकारणात पहिल्यांदा दोन अंकी संख्याबळाचा आकडा गाठला; तर ताराराणी आघाडीने तब्बल 19 जागा जिंकल्या. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात हाताच्या बोटावर मोजण्याएवढा फरक राहिला. काही जागांचा फरक झाला असता, तर भाजप-ताराराणी आघाडीने महापालिकेची सत्ता काबीज केली असती.
* अपक्षांची मोट बांधून ताराराणी आघाडीच्या माध्यमातून महादेवराव महाडिक यांचे राजकारण
* धनंजय महाडिक, सतेज पाटील, मालोजीराजे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ताराराणी आघाडीतून
* सप्टेंबर 2010 मध्ये आघाडीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण
* 2010 साली ताराराणी आघाडी
* पक्षाचे रजिस्ट्रेशन
* 2015-20 मध्ये महापालिका निवडणुकीत पक्ष म्हणून रिंगणात
* 2009 मध्ये सतेज पाटील आघाडीतून बाहेर; मालोजीराजे अलिप्त
* सध्या धनंजय महाडिक भाजपचे खासदार, तर सतेज पाटील काँग्रेसचे आमदार
* आघाडीचे सर्वेसर्वा महाडिक कुटुंबीय सध्या भाजपमध्ये