

महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. कार्यकर्त्यांत धामधूम सुरू झाली आहे. पाच वर्षे उलटली तरी निवडणुका न झाल्याने इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असली तरी स्वतंत्रपणे मैदानात उतरण्यासाठी कार्यकर्त्यांकडून आग्रह धरला जात आहे. स्थानिक नेतेमंडळीवरही त्यासाठी दबाव वाढत आहे. नेतेमंडळीही आता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भाषा करू लागले आहेत. परिणामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळ आजमवणार, अशी स्थिती आहे. आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये आधी कुस्ती अन् मग दोस्ती असे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर महापालिकेत 2010 सालापासून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे या आघाडीची सूत्रे होती. काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढून निकालानंतर सत्तेसाठी हातमिळवणी करत होते. त्यानुसार महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेचा झेंडा फडकत होता. कालांतराने त्यांनी भाजप-ताराराणी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेलाही सत्तेत सहभागी करून घेतले. त्यानंतर महापालिकेची सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या पक्षांच्या हातात होती. अशाप्रकारे राज्यात पहिल्यांदा कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली होती.
गेल्या काही वर्षांत राज्यात अनेक उलथापालथी झाल्या आहेत. त्या राजकारणाचा परिणाम आता महापालिकेतही होणार आहे. आ. पाटील व मंत्री मुश्रीफ हे एकेकाळचे मित्र आता एकमेकांविरोधात रणांगणात उतरणार आहेत. महाविकास आघाडीची सूत्रे थोरला भाऊ म्हणून काँग्रेसकडे राहणार आहेत. कोल्हापूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीची (शरद पवार गट) ताकद नगण्य आहे. त्यातच काँग्रेसकडे प्रत्येक प्रभागातील इच्छुकांची संख्या जास्त आहे. परिणामी आ. पाटील यांना आपल्या पक्षातील इच्छुकांना न्याय देण्यासाठी स्वतंत्रपणे लढण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी हे हाताच्या बोटावर मोजण्या इतपत जागावर समाधान मानणार नाहीत. मात्र स्वतंत्रपणे प्रत्येक प्रभागात उमेदवार उभा करण्याएवढी त्यांची ताकद नाही हेही वास्तव आहे.
महायुतीमध्ये भाजप थोरला भाऊ असला तरी सद्य:स्थितीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) पारडे जड आहे. जिल्ह्यातील सत्ता आता महायुतीकडे आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तरचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपची धुरा खासदार धनंजय महाडिक व कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्यावर असेल. मुश्रीफ हे स्वतंत्रपणे लढण्यावर ठाम आहेत. सत्ताधारी पक्ष असल्याने इच्छुकांची संख्या जास्त आहे. परिणामी महायुतीमधील तीन्ही पक्षांतील कार्यकर्ते स्वतंत्रपणे लढण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे महायुतीमधील पक्ष आपापल्या हिमतीवर मैदानात उतरतील. महाविकास आघाडी आणि महायुती पक्षातील नेतेमंडळी निकालानंतर समविचारी पक्षांशी हातात हात घालून महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकवतील.