

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी 595 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या सर्व केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. सात निवडणूक कार्यालयांतील निवडणूक निर्णय अधिकार्यांचे सर्व मतदानाच्या प्रक्रियेवर वॉच राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
त्या म्हणाल्या, महापालिकेच्या निवडणुकीत मात्र, सर्व मतदान केंद्रे 100 टक्के वेबकास्टिंग करणार आहे. सर्व ईव्हीएम मशिनची तपासणी झाली असून, मतपत्रिकांचा समावेश करणे आणि प्रोग्रॅम सेटिंग करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत दुधाळी, हॉकी स्टेडियम निवडणूक कार्यालयांतर्गत असणार्या सर्व प्रभागांतील मशिनची सेटिंगचे काम सुरू झाले आहे. सर्व निवडणूक कार्यालयातील ‘ईव्हीएम’चे कामकाज दोन दिवसांत पूर्ण होईल. ईव्हीएम मशिन तपासणीत 25 कंट्रोल युनिट आणि 40 बॅलेट युनिट नादुरुस्त आढळून आले होते. ती बदलून घेतले जाणार आहेत. संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम मशिनचे अभियंते कोल्हापुरात असणार आहेत. काही बिघाड झाल्यास ते दुरुस्त करणार आहेत.
384 दिव्यांग मतदार
महापालिका निवडणुकीसाठी 384 दिव्यांग मतदार असून, प्रत्येक मतदान केंद्रावर त्यांना मतदानाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी विशेष माहिती दिली जाणार आहे. व्हीलचेअरची सोय केली जाणार आहे. 80 वयावरील ज्येष्ठ नागरिक अथवा आजारी मतदारांना घरातून मतदान घेण्याची सुविधा मनपा निवडणुकीत नसल्याचेही के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
मतदानाचा टक्का वाढविण्याचे टार्गेट
कोल्हापूरमध्ये कोणतीही निवडणूक असल्यास चुरशीने होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदान टॉपवर असते. 2015 मध्ये मनपा निवडणुकीवेळी 68.85 टक्के मतदान झाले होते. दहा वर्षांनी मतदान होत असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून, गतवेळच्या तुलनेत 5 टक्के मतदानाचा टक्का वाढविण्याचे टार्गेट असल्याची माहिती प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
ईव्हीएम मशिनसाठी स्ट्रॉग रूम
निवडणूक कार्यालयामध्येच ईव्हीएम मशिनसाठी स्ट्रॉग रूम केली आहे. या ठिकाणी 24 तास पोलिस बंदोस्त तैनान केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त यांनी मनपा निवडणुकीचा पोलिस प्रशासन आणि मनपा प्रशासन यांची बुधवारी संयुक्त बैठक घेतली. मतदान आणि मतमोजणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. मतदानासाठी 61 झोनल ऑफिसर नियुक्त केले असून, त्यांचे प्रशिक्षणही घेतले जाईल. अंतिम मतदार यादी मतदान केंद्रासह निवडणूक अधिकार्यांना दिली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले.
6 हजार 15 दुबार मतदार
कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील मतदार यादीत प्रथम 15 हजार दुबार मतदारांची नोंद झाली होती. जाग्यावर जावून तपासणी केली असून, 6 हजार 15 मतदारांची नोंद दुबार झाल्याचे आढळून आले आहे. यापैकी 2 हजार 594 मतदारांनी कोणत्या एका ठिकाणी मतदान करणार आहे, याचे हमीपत्र दिले आहे. याची माहिती संबंधित केंद्रप्रमुखांना दिली आहे. त्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे. तसेच, मतदार यादीतील उर्वरित डब्बल स्टार असणार्या 3 हजार 521 दुबार मतदार मतदानासाठी आल्यानंतर केंद्रावरच त्यांचे हमीपत्र घेतले जाणार आहे.
तीन तासात लागणार निकाल; चार ठिकाणी मतमोजणी
महापालिकेसाठी 15 जानेवारील मतदान होणार असून, दुसर्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारील मतमोजणी आहे. 290 कर्मचारी यासाठी नियुक्त केले आहेत. मतमोजणी कशी करावी याबाबत या कर्मचार्यांना 12 जानेवारीस प्रशिक्षण दिले जाणार आहे. दोन ते तीन तासात सर्व 81 जागांवरील निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.