

कोल्हापूर : नगराध्यक्षपदापाठोपाठ नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या प्रभागांचे आरक्षण सोडत पद्धतीने बुधवारी निश्चित करण्यात आले. यामुळे काही ठिकाणी आनंदाचे, तर काही ठिकाणी नाराजीचे चित्र पाहावयास मिळाले. सोयीचे आरक्षण पडलेल्या प्रभागांतील इच्छुकांनी आतापासूनच प्रचाराचा धुरळा उडविण्यास सुरुवात केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आरक्षण निश्चित झाल्याने उमेदवारांना दिवाळी शुभेच्छांच्या निमित्ताने मतदारांना भेटण्याची संधी मिळाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कागल, कुरुंदवाड, गडहिंग्लज, जयसिंगपूर, वडगाव, शिरोळ, मुरगूड, मलकापूर, पन्हाळा, हुपरी या नगरपरिषदा, तर हातकणंगले, आजरा, चंदगड या नगरपंचायती आहेत. हातकणंगले, हुपरी, आजरा, चंदगड या पंचायत समित्या नव्याने स्थापन झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीअखेर पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे निवड प्रक्रिया गतीने सुरू आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर प्रभाग आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सकाळी त्या तहसील कार्यालयामध्ये आरक्षण प्रक्रिया पार पडली. यासाठी इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात आले.
निवडणुकीत आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. त्यावरच इच्छुकांचे निवडणूक रिंगणात उतरायचे की नाही, हे ठरत असते. आरक्षणामुळे काही नगरपालिकांमध्ये विद्यमानांना धक्का बसला आहे. अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. हक्काचा प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांनी आता आजूबाजूच्या प्रभागात चाचपणी सुरू केली आहे.