

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : महापालिका प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीपासूनच त्याबाबतचा वाद सुरू झाला होता.आता ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याला आव्हान देण्याची भाषा सुरू केली आहे. त्यासाठी या प्रारूप प्रभाग रचनेतील त्रुटी शोधल्या जाणार असून यासाठीची यंत्रणा कार्यरत झाली आहे.
प्रभाग रचनेचे काम हे पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पूर्वीच केली होती. या कामाकडे आपले लक्ष असेल, असेही त्यांनी ठणकावले होते. यामागे राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाची पार्श्वभूमी होती. पूर्वी हे काम राज्य निवडणूक विभागाकडून होत असे. मात्र, या कार्यपद्धतीत बदल करून राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून प्रारूप प्रभाग रचनेचे काम केले जाईल. त्यावर हरकती आल्यास त्याची सुनावणी घेऊन हरकतींची निर्गत करून ही प्रभाग रचना जिल्हाधिकार्यांमार्फत नगरविकास विभागाला देण्यात येईल व नगरविकास विभाग ही प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार असल्याची निर्णयप्रक्रीया निश्चित करण्यात आली.
या प्रक्रीयेवरच महाविकास आघाडीच्या अधिकार्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचना वादात सापडणार हे अगोदरच स्पष्ट झाले होेत. आता प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यावर आपली भूमिका जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रारूप प्रभाग रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता ही प्रभाग रचना कशी सदोष आहे हे शोधण्यासाठी त्याची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. यावर आक्षेप घेण्याची जी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येईल तेथे रितसर आक्षेप नोंदवून नंतर त्यावर उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली जात आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी तसे सुतोवाच केले आहे.
चार सदस्यांचा एक प्रभाग झाल्यामुळे या प्रभागातील मतदारांची संख्या ही 24 हजारांपासून ते 34 हजारांपर्यंत झाली आहे. एक सदस्यीय प्रभागात पूर्वी ही मतदारसंख्या चार हजार ते सात हजार होती. या प्रभागाची रचना करताना यामध्ये कोणाला राजकीय फायदा होईल अशा पद्धतीने किंवा कोणाला तरी अडचणीत आणणारी व्यवस्था करण्यात आली आहे का? याचा शोध घेतला जात आहे. यावर आक्षेप घेण्याचा हाच एक प्रमुख मुद्दा ठरणार आहे.