

कोल्हापूर : 'तू काय महापालिकेचा मालक लागून गेलास काय? तुझं लयं झालयं, तुला आता बघतोच...', 'तुझ्यात दम असेल तर महापालिका चौकात ये... तुला माझा हिसका दाखवतो!' ही भाषा कुठल्या गल्ली-बोळातील गुंडांची नाही, तर कोल्हापूर महापालिकेतील सत्ताधारी महायुतीचे शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांच्यातील आहे. सत्तेच्या माजात आणि वैयक्तिक अहंकाराच्या लाथाळीत या दोन्ही नेत्यांनी मनपा इमारतीला चक्क भाईगिरीचा आणि राड्याचा अड्डा बनवून टाकले. थेट आयुक्तांच्या दालनासमोरच दोघांमध्ये तुंबळ खडाजंगी उडाली. शड्डू ठोकून एकमेकांना आव्हाने देण्यात आली आणि काही क्षणांतच शेकडो समर्थकांच्या गर्दीने महापालिकेचा परिसर अक्षरशः हायव्होल्टेज तणावाखाली आला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, संपूर्ण महापालिका परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
आयुक्तांच्या बैठकीत राडा; कर्मचारी धावले
आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, सभागृह नेते मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक सुरू होती. धोकादायक वृक्ष तोडीला परवानगी देण्यावरून देशमुख व फरास यांच्यात ठिणगी पडली. बघता बघता दोघांचाही संयम सुटला आणि आयुक्त कार्यालयाबाहेरच मोठमोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ सुरू झाली. दोघांचा हा आरडाओरडा ऐकून महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतली.
५०० हून अधिक कार्यकर्ते चौकात...
दोन्ही नेत्यांमधील राड्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच दोघांचेही पाचशेहून अधिक आक्रमक कार्यकर्ते महापालिका चौकात जमा झाले. त्यामुळे परिस्थिती स्फोटक बनली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी मोठा फौजफाटा तैनात करून महापालिकेचे मुख्य दरवाजे बंद केले आणि इमारतीला कडेकोट बंदोबस्ताचा गराडा घातला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी देशमुख यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कौसर बागवान यांच्या दालनात, तर फरास यांना त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात बसवून पोलिसांनी ताबा घेतला.
महापौरांसह पदाधिकाऱ्यांची धावपळ अन् मध्यस्थीची कसरत
घटनेचे गांभीर्य ओळखून महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समितीचे सभापती शिराळे, सभागृह नेता जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी हस्तक्षेप केला. महापौरांनी स्वतः चौकात उतरून जमा झालेल्या आक्रमक कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत बाहेर काढले. पोलिसांनी लाठीचा धाक दाखवत चौकातील गर्दी पांगवली. शेवटी दुपारी चारच्या सुमारास महापौर निकम, स्थायी समितीचे सभापती शिराळे, सभागृह नेते जाधव यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या गराड्यातून आधी देशमुख यांना गाडीत बसवले आणि त्यानंतर फरास यांना सुरक्षित बाहेर काढले.