

कोल्हापूर ः कोल्हापूर, सांगली महापालिकेसह राज्यातील 19 ड वर्ग महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश नगर विकासचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज यांनी मंगळवारी दिले. प्रभाग रचना चारसदस्यीय होणार असल्याने नगरसेवकांची संख्या आता 81 वरून 100 तर प्रभागांची संख्या 25 होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, प्रभाग रचनेच्या आदेशाने निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे. लोकसंख्येच्या आणि मतदार संख्येनुसार ही प्रभागचना होईल. पूर्वीच्या सरासरी सहा हजार मतदार संख्येमध्ये चौपट वाढ होऊन ती आता सुमारे 24 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
2015 मध्ये झालेली निवडणूक एक प्रभाग एक सदस्य यानुसार झाली होती. 81 प्रभागांतून 81 नगरसेवक निवडून आले होते. नोंव्हेबर 2020 मध्ये या सभागृहाची मुदत संपली. परंतु लॉकडाऊनमुळे निवडणूक लांबली. या दरम्यान राज्यात तीन नवी सरकारे आली. 2020 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांनी यापूर्वी महायुतीच्या सरकारने घेतलेला बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा आदेश रद्द करून एकसदस्यीय प्रभागरचनेचा आदेश काढला. त्यानंतर पुन्हा 2022 मध्ये महायुतीचे सरकार आले.या सरकारने पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा आदेश काढला.या आदेशानुसारच आता ही निवडणूक होणार आहे.
कोल्हापूर महापालिकेने यापूर्वी 2022 मध्ये तीनसदस्यीय प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत काढली होती. यामध्ये 31 प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या 92 इतकी होती. परंतु आता नवा आदेश चारसदस्यीय प्रभागरचनेचा असल्याने प्रभागांची संख्या 25 आणि नगरसेवकांची संख्या 100 इतकी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिकांसाठी चारसदस्यीय प्रभागचना आहे. अपवादात्मक स्थितीत भौगोलिक संलग्नता व मतदारसंख्येचा विचार करून ही संख्या कमीत कमी तीन किंवा जास्तीत जास्त पाच करता येणार आहे. परंतु सर्व प्रभाग चार सदस्य संख्येचेच असावेत,असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे. प्रभागचना करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. त्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत पुढे जावे व शेवटचा प्रभाग दक्षिण दिशेचा करावा. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने निश्चित करावेत, असे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार कसबा बावडा उलपे मळ्यातून प्रभागरचनेची सुरुवात होईल व शेवटचा प्रभाग राजेंद्रनगर येथे असेल.
राज्यभरातील महापालिकांसाठी प्रभागरचना करताना एका इमारतीचे, चाळीचे, घराचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. तसेच प्रभागाच्या सीमारेषा ठरविताना मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, रेल्वे रुळ, फ्लाय ओव्हर इत्यादीच्या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेऊन सीमारेषा ठरविल्या जाणार आहेत.
रचना करताना प्रभागातील वस्त्यांचे विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी. अनुसूचित जाती-जमाती यांच्या वस्त्यांचे विभाजन करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांचे दळणवळण, प्रभागातील मैदाने, शाळा या त्याच प्रभागात ठेवल्या जाणार आहेत.
राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शनक तत्त्वानुसार प्रभाग रचना झाली आहे किंवा नाही हे तपासण्याची तसेच प्रभाग रचनेचे प्रारूप व नकाशे तयार करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. त्यानंतर ह अंतिम मंजूरीसाठी प्रभाग चनेचे प्रारूप जिल्हाधिकार्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतर प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल.