

कोल्हापूर : गेली पाच ते सहा वर्षे थंडावलेल्या कोल्हापूर महापालिका राजकारणास आता नव्याने उकळी फुटली आहे. एकमेकांचे उट्टे काढण्याचा प्रकार आता सुरू झाला आहे. कोल्हापूर महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीवरून शह-काटशहचे राजकारण होत आहे. गतवेळच्या सभागृहात माजी महापौर सुनील कदम यांच्या स्वीकृत सदस्य निवडीवर तत्कालीन सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने आक्षेप घेतला होता. क्राँग्रेसचे सुनील मोदी यांच्या स्वीकृत सदस्यत्वाबाबत आक्षेप घेऊन त्याचेच उट्टे या निमित्ताने काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महापालिकेत सत्तेत आलेल्या महायुतीने विरोधकांच्या स्वीकृतला बेक लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गतवेळच्या सभागृहात महाविकास आघाडीतील काँग््रेासने विरोधी बाकावरील सुनील कदम यांच्या स्वीकृत सदस्यपदावर गदा आणली होती. त्यामुळे यंदा हा प्रयत्न सुरू आहे. महानगरपालिकेत सध्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य या महायुतीची सत्ता आहे. भाजपच्या रूपाराणी निकम महापौर, तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. तर स्वीकृत सदस्य निवडीसाठी प्रक्रिया सुरू आहे.
भाजपतर्फे विजय जाधव, प्रा. जयंत पाटील आणि सुनील वाडीकर, काँग््रेासचे सुनील मोदी, राहुल माने आणि मुश्ताक मलबारी आणि शिवसेनेचे प्रसाद चव्हाण आणि रत्नेश शिरोळकर यांनी स्वीकृत सदस्य पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. यावर शुक्रवारी सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. शिक्कामोर्तब करण्यापूर्वीच विरोधकांच्या स्वीकृत सदस्याच्या नियुक्तीस बेक लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुनील मोदी यांच्या बाबत आक्षेप नोंदवून त्यांच्या नियुक्तीस बेक लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी महापौर सुनील कदम यांनी यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत.