

कोल्हापूर : महापालिकेत गेल्या काही वर्षांत बदल्यांचे वारे वाहिलेले नाही. परिणामी, मलईदार विभागांतच काही अधिकारी व कर्मचार्यांनी ठाण मांडले आहे. मोजक्या विभागांतील अधिकारी तर अगदी खुर्चीला चिकटून बसले आहेत. जणू त्याच विभागासाठी आणि टेबलसाठी ते महापालिकेत भरती झाले आहेत. बदल्या न झाल्याने वर्षोनुवर्षे त्याच खुर्चीवर ठिय्या मारलेले अधिकारी-कर्मचारी प्रत्येक फाईलसाठी अर्थपूर्ण व्यवहारही करत असल्याने नागरिकांतून अशांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेत सुमारे 36 पेक्षा जास्त विभाग आहेत. त्यात चार हजारांहून जास्त अधिकारी-कर्मचारी काम करत आहेत. आर्थिक व्यवहार होणार्या विभागांत नियुक्तीसाठी अधिकारी-कर्मचार्यांची पसंती असते. तसेच, विभागप्रमुखही जास्तीत जास्त नफा मिळवून देणार्या कर्मचार्यांसाठी आग्रही असतात. त्यासाठी वरिष्ठांकडे संबंधित कर्मचारी खूप कष्टाळू असल्याचे भासवून त्याला आपल्या विभागात नियुक्त करून घेतात. अशाप्रकारे मलईदार विभागांत अनेक अधिकारी-कर्मचारी अनेक वर्षे ठिय्या मांडून आहेत.
काही वर्षार्ंपूर्वी तत्कालीन आयुक्त अभिजित चौधरी यांनी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी-कर्मचार्यांच्या बदल्या करून चांगलाच दणका दिला होता. त्यासाठी त्यांनी पर्यायही दिले होते. त्यानुसार बदल्या झाल्यानंतर अधिकारी-कर्मचार्यांत चांगले वातावरण होते. मात्र, त्यानंतर कोरोनासह विविध कारणांनी सुमारे आठ वर्षे बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ठराविक टेबल म्हणजे त्या त्या अधिकार्यांसाठी ‘कुरण’ बनले आहे.
महापालिकेच्या इतर विभागांतील अधिकारी-कर्मचार्यांना बदलीचा जो नियम असेल तो आयुक्त कार्यालयातील कर्मचार्यांनाही असायला पाहिजे. परंतु, आजअखेर आयुक्त कार्यालय अपवाद ठरविले गेले आहे. त्यामुळे आयुक्त कार्यालयातील काही कर्मचारी अक्षरशः महापालिकेचे ‘मालक’ बनल्याची स्थिती आहे. आयुक्त दोन-तीन वर्षांत बदली झाल्यानंतर जातात. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरसह इतरांसाठी आयुक्त कार्यालयात ठाण मांडून बसलेले कर्मचारी म्हणजेच ‘आयुक्त’ झाले आहेत. त्यांना हलविण्याचे धाडस करणार कोण? असा प्रश्न इतर विभागांतील अधिकारी-कर्मचार्यांत उपस्थित केला जात आहे.
चिफ ऑडिट
अंतर्गत लेखापरीक्षक
लेखापाल कार्यालय
नगररचना विभाग
प्रोजेक्ट विभाग
घरफाळा विभाग
पाणीपुरवठा (बिलिंग व प्रोजेक्ट)
अतिक्रमण विभाग
वॉर्ड ऑफिस
कामगार विभाग
रचना व कार्यपद्धती विभाग
जनसंपर्क कार्यालय
उपायुक्त व सहायक आयुक्त कार्यालय
नगरसचिव कार्यालय
आरोग्य विभाग
ड्रेनेज विभाग
इस्टेट विभाग
ग्रंथालय