Kolhapur Municipal Corporation: महापालिकेत नवे राज्य, नवे चेहरे; पण कारभार करणार जुनेच मोहरे

सत्तेची समीकरणे बदलण्याच्या उद्देशाने उमेदवारांची झाली अदलाबदल
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur municipal corporationPudhari File Photo
Published on
Updated on
सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकारणात महापालिकेतील काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत महायुतीने सत्ता काबीज केली. सत्तेची अदलाबदल झाली. सभागृहातील चेहरे बदलले. मात्र कारभाराची सूत्रे पुन्हा जुन्याच राजकीय खेळाडूंच्या हातात आहेत.

महापालिका निवडणुकीपूर्वीच सत्तेचा गणिती खेळ रंगला होता. सत्तेची समीकरणे बदलण्याच्या उद्देशाने विविध पक्षांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अदलाबदल केली. परिणामी अनेक कट्टर कार्यकर्ते पक्ष बदलून नव्या झेंड्याखाली उभे राहिले. या राजकीय स्थलांतरामुळे राजकारण ढवळून निघाले. पक्ष बदलले, झेंडे बदलले. पण राजकीय चेहरे मात्र तेच राहिल्याचे सभागृहात दिसत आहे.

गेल्या सभागृहात राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असलेले प्रा. जयंत पाटील यांनी यंदा भाजपचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीच्या ‌‘स्वीकृत‌’वरून राजकारणात ठसा उमटविलेल्या पाटील यांचे आता भाजपमध्ये आगमन झाले आहे. महायुतीतील सत्तेच्या नव्या समीकरणात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. गेल्या सभागृहातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, नगरसेवक राजेश लाटकर यांनीही काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. यंदा काँग्रेस सत्तेबाहेर असली तरी लाटकरांकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आहे.

आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व गटनेता आदिल फरास आहेत. गतवेळचे काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करत नव्या राजकीय समीकरणात स्थान मिळविले. शिवसेनेने त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपविली. परिणामी काँग्रेसमधील प्रमुख चेहरा असलेले देशमुख आता महायुतीच्या घटक पक्षात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. काँग्रेसमधील रिक्त गटनेतेपदाची जबाबदारी आता इंद्रजित बोंद्रे यांना दिली आहे.

गेल्यावेळचे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राहिलेले मुरलीधर जाधव यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सत्तापालटानंतर त्यांना भाजपने सभागृह नेतेपद सोपविले. विरोधी बाकांवरून सत्ता काबीज करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. ताराराणी आघाडीचे कारभारी राहिलेले आणि आता शिवसेनेचे सदस्य असलेले सुनील मोदी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यामुळे पक्षांची अदलाबदल आणि नव्या नातेसंबंधांची जुळवाजुळव महापालिकेच्या राजकारणात किती वेगाने घडली याची प्रचिती येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news