Kolhapur Municipal Corporation | महापौर, उपमहापौर निवड 6 फेब्रुवारीला

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal Corporation | महापौर, उपमहापौर निवड 6 फेब्रुवारीला
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीसाठी शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी विशेष सभा आयोजित केली आहे. या सभेचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी अमोल येडगे भूषविणार आहेत. संख्याबळाच्या आधारे महायुतीचा दावा भक्कम असला, तरी महायुतीअंतर्गत महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार, यावर अद्याप एकमत झालेले नाही. भाजप व शिवसेना यांच्यात महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.

गुरुवारी (दि. 22) महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली असून, हे पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. महापौर व उपमहापौर निवडीची तारीख जाहीर झाली असली, तरी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक अद्याप झालेली नाही. त्यामुळे सत्तावाटपाचा ‘फॉर्म्युला’ निश्चित झालेला नाही. 2015 मध्ये दोन्ही काँग्रेसने राबविलेल्या सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसारच यंदाही सत्तावाटप होईल, असे शिवसेनेचे नेते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप नेत्यांनी समन्वय साधलेला नाही.

महापौरपदावर भाजपचा दावा

या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपच्या सर्वाधिक 26 जागा निवडून आल्याने महापौरपदावर भाजपने दावा केला आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण असल्याने विजयसिंह खाडे-पाटील, प्रमोद देसाई, विजय देसाई, वैभव कुंभार आणि रूपाराणी निकम यांच्या नावांची चर्चा आहे.

दरम्यान, आघाड्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही. शुक्रवारी (दि. 23) भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत गटनेतेपदासाठी बंद पाकिटातून नावे घेऊन ती प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत. मात्र, गटनेतेपदाचे अधिकृत पत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. भाजपकडून मुरलीधर जाधव यांचे नाव गटनेतेपदासाठी निश्चित होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेकडून गटनेता म्हणून शारंगधर देशमुख यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिल फरास यांचे नाव गटनेतेपदासाठी निश्चित मानले जात असून, पक्षाचे चारही नगरसेवक त्यांच्या नावावर एकमताने ठाम आहेत.

उपमहापौर शिवसेनेकडे जाण्याची शक्यता

सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी येत्या दोन दिवसांत महायुतीची संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. महापौरपद भाजपकडे गेल्यास उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे सभापतिपद शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास उपमहापौरपदासाठी शिवसेनेतही अंतर्गत स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news