

कोल्हापूर : लॉकडाऊनसह अन्य विविध कारणांनी लांबलेली महापालिका निवडणूक नुकतीच झाली. तब्बल साडेपाच वर्षांच्या कालखंडानंतर शुक्रवारी (दि. 20) कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होत आहे. महायुती सत्तेत असून काँग््रेास हा प्रबळ विरोधक असल्याने पहिल्याच सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमधील खडाखडी पाहायला मिळणार आहे. या सभेत नागरिकांच्या प्रश्नांवर सभागृह गाजणार की विरोधक सत्ताधारी एकमेकांचे उट्टे काढण्यात मग्न राहणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
लॉकडाऊननंतर तब्बल पाच वर्षांच्या कालखंडानंतर झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती पक्ष या महायुतीने सत्ता मिळविली आहे. भाजपच्या रूपाराणी निकम महापौर तर उपमहापौरपदी अक्षय जरग विराजमान झाले आहे. शुक्रवारी (दि.20) पहिलीच सर्वसाधारण सभा होत आहे. स्थायी समिती परिवहन समिती आणि महिला व बालकल्याण समिती सदस्यांची निवड या सभेत केली जाणार आहे. तसेच स्वीकृत सदस्यांच्या नावांवरही याच सभेत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. याबरोबरच स्वर्गीय अजित पवार यांचे तावडे हॉटेल चौकात स्मारक करावे, असा सदस्य ठरावा या सभेत येणार आहे. या सर्व विषयांबरोबरच प्रश्नोत्तरांचा तासही होणार आहे.
बऱ्याच कालावधीनंतर सभा होणार असल्याने महापालिकेतील कारभारीही सरसावले आहेत. एवढेच नाही तर गेल्या अनेक वर्षांची सत्ता संपुष्टात आलेल्या काँग््रेास महाविकास आघाडीस यंदा विरोधी बाकावर बसावे लागले आहे, तर कायम विरोधी बाकावर असलेल्या भाजपला सत्ता मिळाली आहे. विरोधकांकडे प्रभावी संख्याबळ आहे. सत्ताधारी-विरोधक तोडीस तोड असल्याने सभेत खडाखडी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शुक्रवारची सभा अनेक अर्थानी गाजणार आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना कोणत्या प्रश्नांवर घेरतील याचा नेम नसल्याने सत्ताधाऱ्यांना सर्व बाजूनी सतर्क राहावे लागणार आहे. विरोधकांत अनुभवी, कारभारी असून त्यांना सभागृहाची व प्रशासनातील बारकाव्यांची माहिती असल्याने ते सत्ताधाऱ्यांना कोणत्याही बाजूने घेरण्याचे काम करतील यात शंका नाही.