

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवणार्या 327 उमेदवारांपैकी तब्बल 100 हून अधिक उमेदवार कोट्यधीश आहेत. यापैकी सहा जणांची संपत्ती दहा कोटींहून अधिक आहे. प्रभाग क्रमांक 17 ड मधील उमेदवार प्रवीण केसरकर यांची सर्वाधिक संपत्ती आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
महापालिकेच्या 81 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या 327 जणांनी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात आपली संपत्ती, शिक्षण, दायित्व, न्यायालयीन प्रलंबित खटले, गुन्हे आदींची माहिती दिली आहे. यामध्ये 327 उमेदवारांपैकी सुमारे 100 उमेदवार कोट्यधीश असल्याचे त्यांच्या शपथपत्रातून समोर आले आहे. यातील सहा उमेदवारांची जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून 10 कोटी पासून 49 कोटींपर्यंत संपत्ती आहे. अनेक उमेदवारांकडे स्थावर मालमत्ता नसून 50 हजारांपासून ते 70 लाखांपर्यंत जंगम मालमत्ता असल्याचीही नोंद या शपथपत्रात आहे. प्रभाग क्रमांक 6 ड मधील स्वप्नील काळे, अझरूद्दीन मकानदार, दिलीप लोखंडे या तीन उमेदवारांनी मालमत्ता रकान्यात निरंक असा उल्लेख केला आहे.
तिसरी उत्तीर्ण ते उच्च शिक्षित शपथपत्रामध्ये उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची माहिती दिली आहे. त्यानुसार तिसरी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांपासून ते अगदी उच्च शिक्षण घेतलेलेही उमेदवार आहेत. यासह गुन्हे दाखल असणारे 34 उमेदवार आहेत.
प्रवीण केसरकर, राहुल माने, माधवी मानसिंग पाटील, मुरलीधर जाधव, भुपाल शेटे, राजेंद्र साळोखे, शारंगधर देशमुख, धीरज पाटील, विनायक कारंडे, तेजस्वनी घोरपडे, उमा बनछोडे, सत्यजित जाधव, ऋतुराज क्षीरसागर, रमेश खाडे, महेंद्र चव्हाण यांचा यामध्ये समावेश आहे. त्यातील नेहा तेंडूलकर, माधवी पाटील, शारंगधर देशमुख, ॠग्वेदा राहुल माने, प्रवीण केसरकर यांची संपत्ती 11 कोटींपासून ते 49 कोटीपर्यंत आहे.