

डॅनियल काळे
कोल्हापूर ः कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. कुणाच्या प्रभागात नवे भाग जोडले गेले, तर कुणाच्या पारंपरिक क्षेत्राचे तुकडे झाले. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि पक्ष दोघांनाही नव्या समीकरणांचा विचार करावा लागत आहे. या प्रभाग रचनेनंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये फोडाफोडीचे राजकारण आणखी तापणार आहे. इलेक्टीव्ह मेरिट असलेल्या उमेदवारांना सर्व प्रकारची रसद पुरवून आपल्याकडे खेचण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रभाग रचनेनंतर नव्या रणनीतीची आखणी केली जात आहे.
राजकीय ताकद, पैसा देणार्या पक्षातच प्रवेश करण्याचा अनेकांचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांशी संपर्क वाढविण्यात आला आहे. पक्षांकडूनही प्रभावी उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. याचबरोबर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना रंगण्याची चिन्हे आहेत. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट यांच्यात सध्या उमेदवार फोडाफोडीवर लक्ष केंद्रित आहे. मात्र, प्रभागात नेमके कोणते भाग आले, यावरच इच्छुक पुढील निर्णय घेणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आता कोणत्याही पक्षातील उमेदवार असो तो प्रभावी असला, तर आपल्याकडेच खेचण्याचा डाव टाकला जात आहे.
अनेक इच्छुक उमेदवारांच्या पारंपरिक मतदारसंघाचे भाग वेगवेगळ्या प्रभागांत गेले. त्यामुळे नाराजीचा सूर आहे. प्रभाव असलेल्या प्रभागाची चार तुकड्यांत विभागणी झाल्याने काही जणांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. काही जणांना हे प्रभाग सोयीचे ठरणार असल्याने त्यांनी आता जोर लावायला सुरुवात केली आहे.
मोठे प्रभाग असल्याने इच्छुकांसाठी मोठे लॉजिस्टिक संकट ठरणार आहे. सोन्या मारुती चौकापासून ते उभा मारुती चौकापर्यंत आणि शिवाजी पेठेपासून मंगळवार पेठेपर्यंतच्या दुसर्या टोकापर्यंत घरोघरी संपर्क ठेवणे आणि निवडून येणे यासाठी आतापासूनच पायाला भिंगरी बांधावी लागणार आहे.
या नव्या प्रभाग रचनेने उमेदवारांच्या रणनीती, संपर्क, पक्षांतर यांना नव्याने चालना दिली आहे. प्रत्येक प्रभाग आता केवळ मतदारांचा समूह नसून, तो एक राजकीय रणांगण ठरत आहे. सुशिक्षित विभाग मतदारसंघात येईल असा अंदाज बांधून घाईगडबडीने पक्षांतर केलेल्यांना आता फेरविचार करावा लागणार असून दाट लोकवस्ती व झोपडपट्टी भाग जोडल्यामुळे पुन्हा घरवापसी करण्याची वेळ काही उमेदवारांवर येणार आहे. त्यामुळे प्रभाग रचना झाल्यानंतर आता राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.