

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या महायुती म्हणून न लढता महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्रपणे लढवाव्यात व निवडणुकीनंतर महायुती म्हणून एकत्र यावे, अशी प्रक्रिया सुरू असताना महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविण्यावर नेते ठाम आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीला स्थानिक पातळीवरचे राजकारण वेगळे आहे. महायुती म्हणून जिल्ह्यात सर्व दहाच्या दहा जागांवर आमदारांना यश मिळाले असले, तरी या निवडणुकीत जागा वाटपात प्रत्येक नेत्याची भूमिका वेगवेगळी आहे. त्यामुळे महायुती म्हणून या निवडणुका लढविण्यात अडचणी असल्याचे नेत्यांसमोर स्पष्ट झाले आहे. मात्र, आपल्यातील नाराजीनंतर ताकदीचे उमेदवार महाविकास आघाडीला मिळू नयेत, म्हणून महायुतीतील घटक पक्ष व मित्र पक्षांनी या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात, असे नेत्यांचे मत आहे.
याउलट महापालिका निवडणुका मात्र महायुती म्हणून लढविण्यावर युतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचे एकमत आहे. एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे असल्यामुळे प्रत्येक प्रभागात प्रत्येक पक्षाच्या वाट्याला जागा येणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढायची व ताकदीने लढायची. प्रभागामध्ये घटक पक्ष व मित्र पक्षांना संधी द्यायची आणि सर्व ताकद पणाला लावून कोल्हापूर महापालिकेलवर महायुतीचा झेंडा फडकावयाचा, अशी रणनीती आखली जात आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर जागा वाटप निश्चित होईल. त्यापूर्वी प्रत्येक पक्ष आपआपला अंदाज घेऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवेल, या द़ृष्टीने वाटचाल सुरू आहे.
महापालिकेच्या जागा वाटपात भाजपने आताच 33 जागा मागितल्या आहेत. भाजप आणि ताराराणी आघाडीचे जेवढे सदस्य होते, तेवढ्या जागा मिळविण्याबाबत भाजप ठाम आहे. शिंदे शिवसेनेचीही तेवढीच मागणी आहे, तर अजित पवार राष्ट्रवादी ही जुन्या महाविकास आघाडीत सत्तेत असल्यामुळे त्यांचाही जागा मागणीचा आकडा मोठा आहे. त्याशिवाय जनसुराज्य शक्तीसह अन्य मित्र पक्ष आहेत. जनसुराज्य शक्ती महापालिका सत्तेत होती. त्यामुळे त्यांनाही सामावून घेताना योग्य जागा द्याव्या लागणार आहेत.