

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील वर्चस्वाच्या लढाईत महायुतीने कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन करण्यासाठी त्या-त्या प्रभागात व मतदारसंघात पक्षाला यश देेऊ शकतील, याची नेत्यांना खात्री असलेल्या उमेदवारांना मानाचे पान देऊन पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे जे आतापासूनच महायुतीतील विविध घटक पक्षांत गेले आहेत, त्यांच्या विरोधकांनी आपआपल्या मतदारसंघातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष व नेत्यांची ताकद ओळखून तिकडे संपर्क ठेवला आहे.
कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे, असे आदेश भाजपच्या नेत्यांनी दिले आहेत. तर कोल्हापूर महापालिकेत आता पहिला महापौर शिंदे शिवसेनेचाच झाला पाहिजे, असे आदेश शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी दिले आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीतील शिंदे शिवसेना व भाजपात प्रवेशाची लगीनघाई उडाली आहे. याची सुरुवात कोल्हापूर उत्तरमधून शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. माजी नगरसेवकांचा मोठा प्रवेशाचा सोहळा घडवून आणला. त्यावर खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपात पक्षप्रवेशाचा सोहळा घडवून आणत दक्षिणेतून स्वारी केली. विशेष म्हणजे महायुतीचे घटकपक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी व विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षातील कार्यकर्त्यांनाही भाजपात प्रवेश दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार राष्ट्रवादीत अद्याप हालचालींना जोर आलेला नाही.
विशेषत: शिंदे शिवसेना व भाजपात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असल्याने त्या-त्या प्रभाग व मतदारसंघातील इच्छुकांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेनेकडे चौकशी सुरू केली आहे. राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये करवीर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश असून, या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी त्यांनी तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.