

डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी अवघे शहर निवडणूकमय झाले असून सर्वच प्रभागांत चुरशीच्या लढती रंगणार आहेत; मात्र 20 पैकी तब्बल 10 प्रभागांतील लढतींना ‘हाय व्होल्टेज’ म्हणून पाहिले जात असून या प्रभागांकडे केवळ शहराचाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचाही रोख लागून राहिला आहे. नेत्यांची प्रतिष्ठा, बंडखोरांची भूमिका आणि मतविभाजनाची शक्यता यामुळे या लढती विशेष महत्त्वाच्या ठरत आहेत.
महापालिकेतील सत्तेचे गणित ठरवण्यात निर्णायक ठरणारे प्रभाग क्रमांक 1, 4, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 19 व 20 हे यंदा विशेष चर्चेत आहेत. बहुतांश ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत दिसत असली, तरी जनसुराज्य शक्ती आणि काही ठिकाणी तिसर्या आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच रंगत आणली आहे. त्यामुळे काही प्रभागांत वन-टू-वन लढती, तर काही ठिकाणी तिरंगी व बहुरंगी संघर्ष पाहायला मिळणार आहे. दहा वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीमुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता असून गल्ली-बोळांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असून प्रत्येक प्रभागात शेवटच्या टप्प्यातील प्रचार चुरशीचा ठरणार आहे.
पक्षनिष्ठ मतदान की व्यक्तीकेंद्री मतदार?
या निवडणुकीत एका मतदाराला चार मते देण्याचा अधिकार असून चार वेगवेगळ्या प्रवर्गांतील उमेदवारांना मतदान करण्याची संधी मतदारांना पहिल्यांदाच मिळत आहे. त्यामुळे उमेदवारांइतकीच उत्सुकता मतदारांमध्येही दिसून येत आहे.
प्रभाग क्रमांक 9-ड मध्ये काँग्रेस विरुद्ध शिंदे शिवसेना अशी थेट वन-टू-वन लढत होत असून या संघर्षाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रभाग क्रमांक 10-ड मध्ये मात्र तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
16-अ (नागरिकांचा मागासवर्ग) आणि 16-क (सर्वसाधारण महिला) या गटांतही एकास एक लढती होत असल्याने निकाल कोणाच्या बाजूने झुकतो, याची उत्सुकता आहे.
18-कमध्ये भाजप, काँग्रेस आणि वंचित आघाडी यांच्यात तिरंगी संघर्ष होणार असल्याने या प्रभागात मतविभाजन निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.