

डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. अंतिम प्रभाग रचना निश्चित झाली असून, आरक्षण सोडतीची तारीखही ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर मतदारयादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यावर इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे.
प्रभागांचे विस्तीर्ण स्वरूप आणि मतदारसंख्येत झालेली चौपट वाढ, यामुळे अनेक अनुभवी उमेदवारांच्या कपाळावर चिंता उमटली आहे. 50 ते 100 मतांचे स्थलांतर जरी एखाद्या प्रभागातून दुसर्यात झाले, तरी निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मतदारयादी तयार करताना प्रत्येक उमेदवाराचा फोकस आता या प्रक्रियेवर आहे. कोणताही गोंधळ किंवा चूक टाळण्यासाठी पक्षनेते आणि संभाव्य उमेदवार बीएलओ व सर्वेक्षण पथकांच्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवत आहेत.
मतदारयादी बनवताना एखाद्या कॉलनीचा तुकडा किंवा एखाद्या गल्लीची बाजू दुसर्या प्रभागात गेली, तरी त्याचा थेट फटका उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे पक्षनेते आणि इच्छुक उमेदवारांनी या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे. जर आताच सावधगिरी बाळगली नाही, तर प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर हरकती व दुरुस्त्यांच्या मोठ्या प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, अशी जाण उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे.
नव्या प्रभाग रचनेमुळे अनेकांच्या पूर्वीच्या मतदारसंघांचे तुकडे होऊन ते वेगवेगळ्या प्रभागांत जोडले गेले आहेत. त्यामुळे काही उमेदवारांना आपल्या हक्काच्या मतांवर पाणी सोडावे लागले आहे. या नव्या प्रभाग रचनेनुसार उमेदवारांनी नव्या भागात संपर्क वाढवण्याची धावपळ सुरू केली आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने अघोषित प्रचारालाही सुरुवात झाली आहे.