

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक यावेळी पूर्वीपेक्षा अधिक चुरशीची होणार आहे. जिल्ह्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि सर्व पक्षांमध्ये महापालिकेवरील वर्चस्वाची झालेली चढाओढ, यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांकडून इलेक्टेबल म्हणजेच निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा शोध सुरू असून, अशा उमेदवारांचा कल अर्थिक रसद पुरवू शकणार्या पक्षांकडे आहे. त्यामुळे पक्षही उमेदवारी देताना संबंधित प्रभागातील राजकीय ताकद आणि उमेदवारांची खर्च करण्याची क्षमता यावरच भूमिका निश्चित करत आहेत.
सध्या भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट व ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट), आम आदमी पार्टी असे सुमारे सहा पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरायच्या तयारीत आहेत. महाडिक विरुद्ध पाटील गट यांच्यात गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेला संघर्ष यंदाही कायम राहणार आहे.
मतदारसंघ मोठा झाल्याने प्रभागाचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा जनसंपर्क करावा लागणार असून, त्यासाठी कोटींचा खर्च ओघानेच येणार आहे. परिणामी ही निवडणूक सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. सत्तेवर असलेल्या पक्षात राहून विकासकामांमध्ये भाग मिळवण्यासाठी, उमेदवार पक्ष निवडताना सत्तेच्या समीकरणांचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या उमेदवारांनी अद्याप आपला पक्ष जाहीर केलेला नाही. राजकीय वार्याची दिशा पाहूनच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
नुसते निवडून येऊन चालणार नाही; तर ज्या पक्षाची सत्ता असेल, त्या पक्षात गेले तर पाच वर्षांत चांगले पद पदरात पाडून घेण्याच्या द़ृष्टीनेही उमेदवारांची व्यूहरचना सुरू आहे. उमेदवार निवडून आले आणि ते जर विरोधी पक्षात असतील तर पाच वर्षांत कोणतेच पद मिळणार नाही. त्यामुळे राजकीय वार्याची दिशा बघूनच उमेदवार निर्णय घेणार आहेत. त्यामुळे काही महत्त्वाच्या उमेदवारांनी अद्याप आपला पक्ष ठरविला नाही. महायुती की महाविकास आघाडी याचा फैसला बेरजेचे राजकारण पाहूनच केला जाणार आहे.