

सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात तब्बल 25 ते 30 हजार मतदार आहेत. इतक्या मोठ्या मतदारसंघात अवघ्या दहा दिवसांत निवडणूक चिन्हासह पोहोचणे हे उमेदवारांसमोरचे सर्वात मोठे दिव्य ठरणार आहे. घरोघरी भेटी, कोपरा सभा, प्रचार फेर्या, सोशल मीडियावरील प्रचार, कार्यकर्त्यांची फौज आणि पक्षाची यंत्रणा या सर्वांचा कस लागणार आहे. प्रचाराच्या प्रत्येक मिनिटाला मोल आले आहे. परिणामी, हे दहा दिवस म्हणजे उमेदवारांसाठी अक्षरशः सत्त्वपरीक्षाच ठरणार आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट राजकीय संघर्ष होत आहे.
निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल होणे, छाननीची प्रक्रिया पूर्ण होणे आणि अखेर निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर आता प्रचाराचा खरा रणसंग्राम सुरू झाला आहे. शहरातील राजकीय वातावरण तापले असून प्रत्येक प्रभागात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. प्रचाराचा धुरळा शांत होईपर्यंत कोल्हापूरचे राजकारण अक्षरशः पेटलेले राहणार आहे.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आता अधिक धारदार होत चालला आहे. विकासकामांचा लेखाजोखा, अपूर्ण प्रकल्प, नागरी सुविधांचा बोजवारा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी, अतिक्रमणांचे प्रश्न असे अनेक मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस आणि महायुती असा सामना सुरू झाला आहे. निवडणुकीत वैयक्तिक टीका, जुने वाद, स्थानिक पातळीवरील गटबाजी यांनाही उधाण आले आहे. काही प्रभागांत बंडखोरीमुळे पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला असून त्याचा थेट परिणाम प्रचारावर दिसून येत आहे. एकाच विचारसरणीतील उमेदवार एकमेकांविरोधात अप्रत्यक्ष प्रचार करत असल्याचे चित्रही काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय नव्हे, तर व्यक्तिकेंद्री लढत ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मतदारही या रणधुमाळीकडे बारकाईने पाहत आहेत. मकोण विकास करेल?फ, मकोण प्रभागाच्या समस्या सोडवेल?फ, मकोण प्रामाणिकपणे काम करेल?फ असे प्रश्न मतदारांच्या मनात आहेत. केवळ आश्वासनांपेक्षा ठोस कामगिरी आणि विश्वासार्हता या मुद्द्यांवर मतदारांचा कल झुकताना दिसत आहे. त्यामुळे उमेदवारांना भावनिक आवाहनांसोबतच वास्तववादी भूमिका मांडावी लागत आहे. एकूणच येत्या दहा दिवसांत कोल्हापूर महापालिकेचे रणांगण अधिकच तापणार आहे. प्रचाराच्या प्रत्येक मिनिटाचा उपयोग करण्यासाठी उमेदवार धडपडताना दिसत आहेत. हा कालावधी कोणासाठी संधीचा, तर कोणासाठी कसोटीचा ठरणार आहे. 13 जानेवारीला प्रचार थांबेल, मात्र त्यानंतर मतदानाच्या दिवशी मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. कोल्हापूरच्या राजकारणाचा हा थरार शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरणार, यात शंका नाही.
संधी अन् अस्तित्व...
महापालिका निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. कमी कालावधीत मोठ्या मतदारसंघावर प्रभाव टाकणे हीच उमेदवारांसाठी खरी कसोटी ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष अधिक धारदार झाला असून विकासकामांचा हिशेब, नागरी सुविधांची अवस्था आणि स्थानिक प्रश्न यावर प्रचार फिरताना दिसत आहे. काही प्रभागांत बंडखोरी व गटबाजीमुळे ही निवडणूक पक्षीयपेक्षा व्यक्तिकेंद्री होत चालल्याचे चित्र आहे. शेवटचे दहा दिवस काहींसाठी संधीचे, तर काहींसाठी अस्तित्वाचे ठरणार आहेत.