

सतीश सरीकर
कोल्हापूर ः कोल्हापूर महापालिकेचे हे नववे सभागृह. आतापर्यंत अनेकांनी दोन-चारवेळा नगरसेवकपद भूषविले. तत्त्वासाठी सभागृहात एकमेकांना धारेवर धरले. शहराच्या प्रश्नांसाठी एकमेकांचे अक्षरशः वाभाडे काढले. बोलण्याच्या ओघात एखादा जरी चुकीचा शब्द गेला, तर दिलगिरी व्यक्त करण्यात कमीपणा मानला नाही. सभागृहातून बाहेर पडताना मात्र सर्वजण एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत अन् चेष्टामस्करीत दंग होऊन बाहेर पडत. यंदाचे सभागृह मात्र त्याला अपवाद ठरत आहे. सभागृहात इतका इगो... खुनशी वृत्ती बरी नव्हे, असे जुनेजाणते माजी नगरसेवक अन् कोल्हापूरवासीय म्हणत आहेत.
महापालिकेत शिवसेना गटनेता शारंगधर देशमुख व राष्ट्रवादी गटनेता आदिल फरास यांच्यात सलग दुसऱ्या सभेत हमरीतुमरी झाली. देशमुख व फरास यांनी एकमेकांना एकेरी भाषा वापरून मला शहापण शिकवू नकोस, तुझ्यासारखी लई बघितल्यात... माझ्यासमोर तुझी दादागिरी चालणार नाही... असे म्हणत महापौर रूपाराणी निकम, आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोरच दोघांनी शड्डू ठोकून एकमेकांना चौकात येण्याचे आव्हान दिले. त्यावेळी सभागृहाचा आखाडाच झाल्याचे चित्र होते. यावरून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा नगरसेवकांवर वचक नसल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे महायुतीचे ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी एक शब्दही दोघांना थांबविण्यासाठी उच्चारला नाही. विरोधी काँग््रेासचे राजेश लाटकर यांच्यासह इतर नगरसेवकही निवांत बसले होते.
महापालिका सभागृह हे शहराच्या विकासाचे धोरण ठरविण्याचे व्यासपीठ आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी रस्त्यावरील गुंडाप्रमाणे भाषा वापरणे ही सभागृहाची पायमल्ली आहे. कोल्हापुरात या व्यासपीठाचे रूपांतर ‘आखाड्या’त झाले, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. सत्ताधारी पक्षातील दोन गटनेत्यांमध्येच अशा पातळीवर संघर्ष होत असेल, तर प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची आणि विकासकामांना गती देण्याची अपेक्षा करणेच चुकीचे ठरणार आहे. मतदारांनी शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिलेल्या नगरसेवकांकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही. वास्तविक ज्या सभागृहात जाण्यासाठी रक्ताचे पाणी करून सर्व नगरसेवक निवडून आले, तेथे अभ्यासपूर्ण मांडणी आणि धोरणात्मक चर्चा करत कोल्हापूरचे प्रश्न सोडवून तो विजय सत्कारणी लावण्याची गरज आहे.
आता प्रश्न केवळ देशमुख विरुद्ध फरास असा राहिलेला नाही, तर महायुतीच्या नेतृत्वक्षमतेचा प्रश्न आहे. अंतर्गत मतभेद सोडवून एकसंघपणे काम करण्याची क्षमता सत्ताधाऱ्यांकडे नसेल, तर पुढील काळात असे प्रकार वाढण्याचीच शक्यता आहे. सभागृहातील हा गोंधळ प्रशासनालाही ‘मोकळे रान’ देणारा ठरू शकतो. कारण, लोकप्रतिनिधी परस्परांशीच झुंजत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण राहणार नाही.
मी, माईक अन् मर्दुमकी...
सभागृहात काही नगरसेवक केवळ स्टंटबाजी करण्यातच रममाण असतात. सभागृहात आकांड तांडव करायचे, अधिकाऱ्यांना शिवीगाळ, दमबाजी करून मर्दुमकी गाजविल्याचा भास निर्माण करतात. कार्यकर्त्यांना किंवा सोशल मीडियावाल्यांना सांगून त्याचे व्हिडीओ करायचे आणि ते व्हायरल करत आहेत. तर काही नगरसेवक माईक वरचा ताबा सोडत नाहीत. माझ्यासारखा जगात कोण विद्वानच नसल्याच्या अविर्भावात प्रत्येक प्रश्नात तोंड खूपसतात. यावरूनच वादाची ठिणगी पडते. मी म्हणजेच पक्ष अन् महापालिका माझ्या मालकीची अशा अविर्भावात काही नगरसेवक वागत आहेत. त्यातूनही वादाला खतपाणी मिळत आहे. काही नगरसेवकांच्या मी, माईक आणि फालतूची मर्दुमकी यामुळे कोल्हापूर शहराची वाट लागत आहे.