Kolhapur News : शहरातील खड्ड्यांना अखेर मलमपट्टी

भरपावसाताच मुरूम टाकून पॅचवर्कला सुरुवात, दै. ‘पुढारी’ वृत्तमालिकेची महापालिकेकडून दखल
Kolhapur News
शहरातील खड्ड्यांना अखेर मलमपट्टी
Published on
Updated on

कोल्हापूर : सततच्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत होती. महापालिका प्रशासनाकडून बुधवारपासून मुरूम टाकून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पॅचवर्कची कामे सुरू केली आहेत. गंगावेश ते बिंदू चौक या प्रमुख मार्गावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधाकांना खड्ड्यांतून रस्ता शोधताना कसरत करावी लागत होती. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहन जाताच चिखलमिश्रित पाणी पादचारी व दुचाकीस्वारांच्या अंगावर उडत होते. यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत होते. अनेक ठिकाणी वाहनांवरील ताबा सुटून अपघाताच्या घटना घडत होत्या. खड्ड्यांमध्ये वाहने आदळल्याने वाहनांचे नुकसान होत होते, तर दुचाकीस्वारांसह चारचाकी चालकांनाही मणक्याला जबर धक्के सहन करावे लागत होते.

शिवाजी पूल ते दाभोळकर कॉर्नर, ताराराणी चौक, दसरा चौक, महाद्वार रोड, स्टेशन रोड, शाहूपुरी, राजारामपुरी, संभाजीनगर, रुईकर कॉलनी, उमा टॉकीज चौक, कसबा बावडा, नागाळा पार्क, शिवाजी पेठ, सानेगुरूजी, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत परिसर तसेच शहरातील अनेक प्रमुख मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘खड्ड्यांच्या विळख्यात कोल्हापूर' ही वृत्तमालिका दै. 'पुढारी'ने सुरू केली आहे. या वृत्तमालिकेची दखल घेत महानगरपालिकेने मुरूम टाकून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे पॅचवर्क सुरू केले आहे. पावसाळ्यानंतर शहरातील सर्व रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news