

कोल्हापूर : कोल्हापुरात शुक्रवारपासून (दि. १६) १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. परिणामी शहरवासीयांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. पाणीपुरवठा विभागाने त्याचे नियोजन केले असून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून १५० एमएलडी व बालिंगा उपसा केंद्रातून ३० एमएलडी पाणी उपसा करून शहराला पुरवठा केला जाईल.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना १० टक्के पाणी कपातीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर महापालिकेने पाणी कपात केली आहे. थेट पाईपलाईनमधून दररोज १६० एमएलडी तर बालिंगा उपसा केंद्रातून ४० एमएलडी पाणी उचलले जाते. सुमारे २०० एमएलडी पाणी दररोज शहराला पुरविण्यात येते. आता त्यात १० टक्के याप्रमाणे २० एमएलडी पाणी कपात होईल.
दिवाळीनंतर दिवसाआड पाणी
कोल्हापूर शहराला काळम्मावाडी व राधानगरी धरणातून पाणी पुरवठा होतो. सध्या धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी जून २०२७ पर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. त्यात तीव्र उन्हामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. एप्रिल-मे मध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवू नये यासाठी शहराला दिवाळीनंतर दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. महापालिकेने त्याचे नियोजन केले आहे.