

कोल्हापूर ः कोल्हापूर महापालिकेत 1,770 पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक आणि आयटी पार्कला मंजुरी मिळाली असून लवकरच फाऊंड्री हब होईल. हद्दवाढ, रस्ते, उड्डाण पूलासह विविध विकासकामांतून कोल्हापूर राज्यात टॉपच्या 10 शहरात आणू, असा विश्वासही आ. क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
आ. क्षीरसागर म्हणाले, मंजूर झालेले आय.टी.पार्क व छत्रपती शाहू मिलच्या जागेत मंजूर स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हबमुळे कोल्हापूर शहराच्या विकासाला नवे परिमाण मिळणार आहेत. आयटी, सेवा आणि पूरक उद्योगांच्या माध्यमातून परिसरात रोजगारासह मोठी आर्थिक उलाढाल होईल.
शाहू मिलमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे टेक्स्टाईल टुरिझम हब (कापड पर्यटन केंद्र) निर्माण करण्यास तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. यामध्ये राजर्षी शाहू महाराज व छत्रपती ताराराणी यांच्या इतिहासाची साक्ष देणारे स्मारक व संग््राहालय, कापड उद्योगाचा इतिहास, कापड विणण्याच्या पद्धती दर्शविणारे शाहू मिल म्युझियम, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग कॉलेज, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी 1200 आसन क्षमता असणारे ऑडिटोरीयम, संगीत विद्यालय, कोटितीर्थ तलावाकडील बाजूचे सुशोभीकरण करून पर्यटनवाढीसाठी ॲम्युझमेंट पार्क आदींचा समावेश असेल, असेही आ. क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी माजी आ. जयश्री जाधव उपस्थित होत्या.