कासारी धरण 'ओव्हर फ्लो'च्या दिशेने

Kolhapur Monsoon Update | धरणात ९७ टक्के पाणीसाठा, ३०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग
Kasari Dam
'कासारी' धरण 'ओव्हर फ्लो'च्या दिशेने file photo
Published on
Updated on
सुभाष पाटील

विशाळगड : कासारी धरण ९७.३५ टक्के भरले आहे. कासारी पाणलोट क्षेत्रात श्रावण सरी जोरात कोसळत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढत आहे. कासारी नदीपात्रात विद्युत गृहातून प्रतिसेकंद ३०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात ११९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाची वाटचाल 'ओव्हरफ्लो' दिशेने असून यवलूज बंधारा पाण्याखाली असल्याची माहिती कासारी धरण शाखा अभियंता एस. एस. लाड व आय. जी. नाकाडे यांनी दिली.

शाहुवाडी तालुक्यातील काही गावांना व पन्हाळा तालुक्याला 'सुजलाम् सुफलाम्' करणाऱ्या कासारी (गेळवडे) या मध्यम प्रकल्पात जूनअखेर ३० टक्के तर जुलैअखेर ८३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. कासारी खोऱ्यातील पाणीप्रश्न व जमीन ओलिताखाली आणण्यासाठी १९७७ साली ३३.२८ किमी.च्या पाणलोट क्षेत्रात ७८.५६ दलघमी पाणी साठ्याच्या धरणाची उभारणी करण्यात आली. त्यासाठी गेळवडे व गजापूर या गावांचे पुनर्वसन करून ३८०.३० मीटर लांबीचा हा प्रकल्प साकारण्यात आला. शाहुवाडीतील २१ गावे व पन्हाळ्यातील ४१ गावांतील ९४५८ एकर सिंचन क्षेत्राला हा प्रकल्प जीवनदायी ठरला आहे. धरणाचे बुडीत क्षेत्र ७७o.६१ हेक्टर असून धरणावर वीज निर्मिती प्रकल्प सुरु आहे.

कासारी मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता २.७७ टीएमसी आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ६२२.६० मीटर इतकी आहे. धरणात ७६.४८ दलघमी इतका पाणीसाठा आहे. धरण २.७० टीएमसी म्हणजे ९७.३५ टक्के भरले आहे. कासारी पाणलोट क्षेत्रात आजअखेर ४३९४ मिमी इतका पाऊस बरसला असून गतवर्षी ३६२६ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षीपेक्षा यंदा ७६८ मिमी पाऊस जादा पडला आहे. गेळवडे या प्रमुख मध्यम प्रकल्पासह कुंभवडे, केसरकरवाडी, पोबरे, पडसाळी व नादांरी हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. हे पाचही लघू प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा ७४.३९ दलघमी तर धरण २.६३ टीएमसी म्हणजे ९५ टक्के भरले होते अशी माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news