चला, आपल्या लोकराजाच्या स्वप्न परिपूर्तीच्या तयारीला!
राजेंद्र जोशी
कोल्हापूर : कोल्हापुरात दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या रेल्वेला आणण्याचे श्रेय लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे जाते. 130 वर्षांपूर्वी संस्थानातील रयतेचे रेल्वेचे स्वप्न साकार करणार्या या लोकराजाला मानवंदना देण्यासाठी कोल्हापूरकरांनी सज्ज होण्याची गरज आहे. त्यासाठी समस्त कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी एकत्रितपणे मिरज-कोल्हापूर रेल्वेचे दुहेरीकरण आणि कोल्हापुरातील तीन ते चार नव्या प्लॅटफॉर्मच्या उभारणीसाठी रेटा लावला पाहिजे. तो रेटा तत्काळ लागला नाही, तर विकासाच्या मार्गावर कोल्हापूर मागे पडू शकते.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत योजनेंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या सुधारासाठी 43 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून सुशोभीकरणाची कामे हाती घेतली जातील. तथापि, पायाभूत सुविधांच्या म्हणजेच प्लॅटफॉर्मची संख्या वाढविणे आणि मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे या विषयांना प्राधान्य दिले गेले नाही, तर रेल्वेस्थानक हे प्रवासाऐवजी पाहण्याचे ठिकाण म्हणून राहण्याचा धोका आहे.
मध्य रेल्वेने मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचा प्रकल्पही जवळजवळ पूर्णत्वास नेला आहे. यामुळे आगामी काळात मिरज-पुणे मार्गावर अतिरिक्त रेल्वे गाड्या उपलब्ध होतील, अशी रेल्वेच्याच वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. या गाड्या कोल्हापूरपर्यंत आणावयाच्या झाल्या, तर कोल्हापुरात गाडी उभारण्यासाठी पुरेसे प्लॅटफॉर्म नाहीत आणि रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या अभावामुळे रेल्वेगाड्यांची वाहतूक होण्यासही मोठ्या मर्यादा आहेत. यामुळे कोल्हापूरकरांनी सर्वप्रथम कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि कोल्हापुरातील प्लॅटफॉर्मची संख्या वाढविण्यासाठी आपली कंबर कसण्याची गरज आहे. विशेषतः सर्वसामान्य गोरगरिबांनी त्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. कारण, आज कोल्हापूरहून पुण्याला जाण्यासाठी एस.टी.च्या तिकिटाचा दर 550 रुपयांवर, तर आरामदायी गाड्यांचा दर 800 ते 900 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. याउलट हाच प्रवास रेल्वेमार्गाद्वारे अवघ्या 250 रुपयांत होऊ शकतो. शिवाय, त्याला सुरक्षेचीही हमी आहे.
कोल्हापुरात रेल्वेस्थानकावर सध्या प्लॅटफॉर्मची दाटीवाटी आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी कोल्हापुरात रेल्वेच्या गाड्यांची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी कार्यरत असलेला आयओएच (इंटरमिजिएट ओव्हरहाऊल) विभाग रूकडी वा हातकणंगले येथे असलेल्या रेल्वेच्या अतिरिक्त जागेमध्ये स्थलांतरित केला, तर त्या ठिकाणी तीन ते चार नवे प्लॅटफॉर्म उभा करता येऊ शकतात. त्यासाठी आवश्यक असणारी पीटलाईनही उभारता येणे शक्य आहे. यासाठी कोल्हापूरकरांचा असंतोष दिसल्याशिवाय रेल्वे प्रशासन हालणार नाही. केवळ कागदपत्रांच्या फाईल्स हालविण्यामध्ये हयात जाऊ शकते.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, शेवटच्या स्थानकापासून रेल्वे गाडी सोडण्याचे रेल्वे मंत्रालयाचे धोरण आहे. या धोरणाला अनुसरून कोल्हापूर रेल्वेस्थानक सुसज्ज झाले, मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणासह दुहेरीकरण झाले, तर मिरजेहून सुटणारी प्रत्येक गाडी कोल्हापूरहून सुटू शकते आणि भविष्यामध्ये कोल्हापूर-वैभववाडी मार्ग कोकण रेल्वेला जोडला, तर कोल्हापूर रेल्वेस्थानकाला मोठे महत्त्व प्राप्त होऊ शकते; परंतु त्यासाठी कोल्हापूरकरांनी आग्रह धरण्यासाठी आंदोलनपर्वाची प्रथम पायाभरणी केली पाहिजे.
राजर्षींच्या स्वप्नावर कळस चढविण्याची संधी
कोल्हापूर रेल्वेस्थानकाची पायाभरणी करताना राजर्षी शाहूंनी सोन्याच्या फावड्याचा वापर केला होता. आता त्यांच्या स्वप्नावर कळस चढविण्यासाठी आपण मागे राहणार असू, तर राजर्षींच्या विचारांचे पाईक म्हणून आपणाला लोकराजावर हक्क सांगता येणार नाही.

