

उजळाईवाडी : जून महिना मध्यावर आला तरी मान्सूनच्या पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने नद्या, ओढे आणि जलस्रोतांच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे. अनेक नदीपात्रे कोरडी पडण्याच्या स्थितीत असून त्याचा थेट परिणाम ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसह औद्योगिक क्षेत्राच्या पाणीपुरवठ्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे पाण्याचा साठा विविध ठिकाणांहून उपलब्ध करणे किंवा उद्योग बंद करणे हाच पर्याय आता उद्योजकांकडे राहणार आहे.
औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या दूधगंगा नदीतील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे सिद्धनेर्ली पाणी उपसा केंद्रावरून आवश्यक प्रमाणात पाणी उपसा करणे सध्या शक्य होत नसल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दररोज ४१० लाख लिटर पाणी उपसा केला जातो; पण नदीपात्रात पाणी नसल्याने गेले दोन दिवस पाणीपुरवठा बंद झाला आहे.
परिणामी, कोल्हापूर विमानतळ, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत व शिरोली औद्योगिक वसाहत या तीन एमआयडीसी परिसरातील उद्योगांना तसेच सहा ग्रामपंचायतींना होणारा पाणीपुरवठा तात्पुरता ठप्प झाला असून पुढील काही दिवस अनियमित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या परिस्थितीमुळे उद्योगांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याबरोबरच उत्पादन प्रक्रियेचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.