Minister Chandrakant Patil | कोल्हापूरचा महापौर भाजपचाच : मंत्री चंद्रकांत पाटील

अडीच वर्षे शिवसेनेचा हक्क : आ. राजेश क्षीरसागर
Kolhapur mayor issue
Minister Chandrakant Patil | कोल्हापूरचा महापौर भाजपचाच : मंत्री चंद्रकांत पाटील
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेवर सत्ता स्थापन केलेल्या महायुतीत आता पहिला महापौर कोणाचा यावरून जुंपण्याची शक्यता आहे. सर्वाधिक जागा जिंकल्याने कोल्हापूरचा महापौर भाजपचाच असेल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठणकावले आहे. त्यावर महायुतीच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे, यामुळे शिवसेनेला अडीच वर्षे महापौरपद मिळाले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतली आहे. यामुळे कोल्हापूरचा महापौर कोणाचा, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या दहा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत महायुतीने प्रथमच कोल्हापूर महापालिकेवर झेंडा फडकावला. सत्तेसाठी आवश्यक 41 ही मॅजिक फिगर गाठताना 45 जागांसह महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले. यामध्ये सर्वाधिक वाटा भाजपचा राहिला. 26 जागा जिंकत भाजप महायुतीतील सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ शिवसेनेने 15 जागा जिंकून विजयात मोठा वाटा उचलला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जागांनी महायुतीची सत्ता भक्कम झाली. मात्र, शिवसेनेचा विजयातील मोठा वाटाच आता भाजपसाठी अडचण ठरण्याची शक्यता आहे.

महापौरपदासाठी पंधरा-वीस दिवसांची प्रतीक्षा असली तरी पहिला महापौर आपलाच व्हावा, यासाठी आता भाजपबरोबर शिवसेनेनेही शड्डू ठोकला आहे. एकीकडे सर्वाधिक जागा जिंकल्याने नैसर्गिक तत्वानूसार पहिल्या महापौर पदावर भाजपाने दावा केला आहे तर दुसरीकडे आमच्या निर्णायक जागेमुळेच सत्तेचे दरवाजे खुले झाले आहेत, आमचा मोठा वाटा दुर्लक्षित करताच येणार नाही, यामुळे आम्ही सत्तेचे समान भागीदार आहोत, अशी ठाम भूमिका घेत शिवसेनेनेशी पहिल्या महापौर पदासाठी दावा केला आहे.

एकीकडे महायुती अभेद्य रहावी, विरोधकांना त्याचा फायदा होऊ नये, याकरीताच जागा वाटपापासून शिवसेनेने तडजोडीची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपापेक्षा कमी जागा वाट्याला आल्या. अनेक हक्काच्या आणि विजयी होणार्‍या जागांवर पाणी सोडले, विजयी होणारे उमेदवार भाजपाला दिले, महायुतीसाठी एकदिलाने काम केले, यामुळे महापौर पदावर दावा केला जात असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

दुसरीकडे भाजपाने कोल्हापूर, इचलकरंजीसह सांगली, सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महापालिकेवर आपला महापौर करण्याची तयारी केली आहे. या सर्व महापालिकेवर महायुतीला यश मिळाले आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी भाजपाच महापौर होईल, असे भाजपाचे म्हणणे आहे. त्यांच्याकडून ते जाहीरपणे सांगण्यातही आले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. मात्र, महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतरच हालचालींना गती येणार आहे. तरीही आतापासूनच महायुतीत पहिल्या महापौर पदावरून दावे-प्रतिदावे करण्यास सुरवात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news