

कोल्हापूर : महापौरपदासाठी मुंबईत एकत्र येण्याच्या उलटसुलट चर्चेने तापलेले राजकीय वातावरण सोमवारी शांत झाले असतानाच, कोल्हापुरात महापौरपदासाठी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महापौरपदाचे आरक्षण अद्याप ठरलेले नाही. बॅक डोअर सुरू असलेल्या चर्चा फ्रंटवर कशाला करायच्या, असे सूचक विधान केल्याने कोल्हापूर महापौरपदाच्या निवडीला नवीन ट्विस्ट मिळाला आहे. यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये मात्र धाकधूक वाढत असल्याची चर्चा आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता सर्वत्र महापौरपदासाठी घडामोडी सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेसच्या निवडून आल्या आहेत; तर महायुतीला बहुमत मिळाले असून, त्यामध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपने महापौरपदावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. परंतु, आमच्या पाठिंब्याशिवाय भाजपला महापौर करता येणार नाही, असा युक्तिवाद करत शिवसेना शिंदे गटाने अडीच वर्षांसाठी महापौरपदावर दावा सांगितला आहे.
मुंबईत महापौरपदावरून भाजप व शिवसेना शिंदे गटात खडाखडी सुरू असताना, शिवसेना शिंदे गट ठाकरे गटासोबत जाण्याच्या तयारीत आहे, अशा बातम्या येऊ लागल्या असतानाच कोल्हापुरात काँग्रेस व शिवसेना शिंदे गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात आमदार पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, मुंबईमध्ये महापौरपदाबाबत काय चर्चा झाली आहे ते आपणास माहीत नाही. कोल्हापुरात तसे काही आहे काय, असे विचारले असता, महापौरपदाचे अद्याप आरक्षण निश्चित झालेले नाही आणि बॅक डोअर सुरू असलेल्या चर्चा फ्रंटवर कशाला करायच्या. वेळ आल्यावर बघू, असे सांगून आमदार पाटील यांनी त्याला एकप्रकारे दुजोराच दिल्याचे मानले जाते. दरम्यान, काँग्रेस, शिंदे शिवसेना एकत्र आल्यास महापालिकेतील सत्तेचे चित्र बदलू शकते. त्यामुळे महापौरपदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतरच पुढील हालचालींना वेग येणार आहे.