

कोल्हापूर : कोल्हापूरचा महापौर आणि उपमहापौर शुक्रवारी (दि. 6) ठरणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता निवडणूक होणार आहे. स्पष्ट बहुमत असल्याने महायुतीचेच महापौर, उपमहापौर होणार हे स्पष्ट आहे, तरीही काँग्रेसला चमत्काराची अपेक्षा आहे. गेली पाच वर्षे महापौर, उपमहापौर नसल्याने शहरवासीयांचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.
महापौरपदासाठी निकम, शेंडे यांच्यात लढत...
महापौरपदासाठी महायुतीतून भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या सचिन मारुती शेंडे यांनी अर्ज भरला आहे. उपमहापौरपदासाठी महायुतीअंतर्गत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अक्षय विक्रम जरग, तर काँग्रेसच्या दुर्वास परशुराम कदम यांनी अर्ज भरले आहेत. महायुतीकडे भाजप 26, शिवसेना 15, राष्ट्रवादी 4 आणि जनसुराज्य शक्ती पक्ष 1 असे 46 नगरसेवकांच्या संख्याबळ आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेस 34 आणि ठाकरे सेना 1 असे 35 नगरसेवक आहेत. त्यामुळे महायुतीकडे सर्वाधिक नगरसेवक असल्याने त्यांचा विजय सुकर आहे.
महायुतीचे नगरसेवक हॉटेलमध्ये अन् महाविकास आघाडीचे घरात !
महायुतीकडे 46, तर महाविकास आघाडीकडे 35 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. महायुतीचेच महापौर, उपमहापौर होणार हे स्पष्ट असले, तरी कोणताही धोका नको म्हणून नेतेमंडळी प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच गुरुवारी (दि. 5) महायुतीच्या सर्वच नगरसेवकांना कोल्हापूर शहरातील दोन हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. 6) सकाळी 10 वाजता सर्वच नगरसेवक एकत्रित महापालिकेत मतदानासाठी येतील. दरम्यान, महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक आपापल्या घरात आहेत. तसेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी पक्षांचे गटनेते आपल्या पक्षातील नगरसेवकांना गुरुवारी व्हिप लागू करणार आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना त्यांच्या त्यांच्या उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक होणार आहे.