Kolhapur tree collapse incident: सीपीआर रस्त्यावरील महाकाय वृक्ष कोसळला; दोन गंभीर जखमी

सुदैवाने मोठी जीवितहानी टळली : ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे दुर्घटना
Kolhapur tree collapse incident
Kolhapur tree collapse incident: सीपीआर रस्त्यावरील महाकाय वृक्ष कोसळला; दोन गंभीर जखमीPudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरातील भाऊसिंगजी रोडवर सीपीआर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संरक्षक भिंतीलगत आणि मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर शंभर वर्षांपूर्वीचा महाकाय वृक्ष मंगळवारी दुपारी कोसळला. या दुर्घटनेत गृहरक्षक जवानांसह दोघेजण गंभीर जखमी झाले; तर मोपेडसह दोन वाहनांचा चक्काचूर झाला. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी जेसीबी मशिनद्वारे केलेल्या खोदाईमुळे झाडाची खोलवर मुळे कमकुवत होऊन ही दुर्घटना घडली. मध्यवर्ती व सतत वर्दळीच्या रस्त्यावर घटना घडल्याने पोलिस, अग्निशमन, शहर वाहतूक यंत्रणेसह प्रशासनाची तारांबळ उडाली.

भाऊसिंगजी रस्त्यावरील वाहतूक दिवसभर ठप्प होती. भाऊसिंगजी रोडवर कोसळलेल्या झाडाखाली सापडून दुचाकीस्वार गृहरक्षक दलाचे जवान तानाजी पांडुरंग पाटील (39, रा. यवलूज, ता. पन्हाळा) व सतीश विश्वास जाधव (57, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) जखमी झाले. मनपा अग्निशमन दल, सर्किट बेंच प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकासह महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वृक्षाच्या फांद्या तोडून जखमींना बाहेर काढले व शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांना गंभीर इजा झाल्याचे सांगण्यात आले.

बुंध्याच्या 14 ते 15 फुटांचा घेर आणि 60 ते 70 फुटापेक्षा अधिक उंचीचे आणि मोठमोठ्या फांद्यांनी वेढलेले झाड रस्त्यावरच कोसळल्याने सीपीआर चौक ते भाऊसिंगजी रोडवरील संपूर्ण वाहतूक मंगळवार सायंकाळपर्यंत ठप्प झाली होती. मनपा अग्निशमन, उद्यान विभाग, मनपा सार्वजनिक बांधकाम विभागासह लक्ष्मीपुरी पोलिस, शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील अधिकाऱ्यांसह 25 पेक्षा अधिक कर्मचारी दोन कटरच्या सहाय्याने कोसळलेल्या वृक्षाच्या फांद्या तोडण्याचे काम करीत होते.

कोसळलेल्या वृक्षामुळे भाऊसिंगजी रोडवर सीपीआर चौक परिसरातील उच्चप्रवाहित विद्युत वाहिनी रस्त्यावर लोंबकळत होत्या. महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. परिसराचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. कोसळलेला वृक्ष हायकोर्टच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या संरक्षक भिंतीवर आदळल्याने भिंतीचे लोखंडी ग््राील उद्ध्वस्त झाले आहे.

सीपीआर रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीजवळील वृक्ष अचानक कोसळल्याने सर्किट बेंच आवार, प्रवेशद्वाराजवळ थांबलेले वकील, पक्षकार, अधिकारी, पोलिस, सुरक्षा रक्षकांसह शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची तारांबळ उडाली. पोलिसांनी भाऊसिंगजी रस्त्यावरील वाहतूक तत्काळ रोखली. दोन्हीही बाजूला लोखंडी बरॅक लावून वर्दळीला मनाई करण्यात आली.

सीपीआर रुग्णालय इमारतीच्या नूतनीकरणासह दर्शनी बाजूची जुनी संरक्षक भिंत पाडून तेथे नवीन संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू आहे. आठवड्यापासून नव्या संरक्षक भिंतीचे पिलर उभे करण्यासाठी जेसीबी मशिनद्वारे आठ ते दहा फूट खोलवर खोदाई करण्यात येत आहे. चार ते पाच दिवसांपासून सकाळी सुरू झालेले काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मंगळवारी सकाळीही खोदाईचे काम सुरूच होते. जेसीबीद्वारे खोलवर खोदाई झाल्याने रुग्णालय संरक्षक भिंतीलगत असलेल्या वृक्षांच्या जमिनीत खोलवर रुजलेल्या मुळ्यांना धक्का बसला होता. वृक्षांची मुळे तुटल्याने झाडे कमकुवत झाली होती.

वृक्ष कोसळताच प्रचंड आवाज आणि धुरळा

रुग्णालय मुख्य प्रवेशद्वारापासून काही फुटांवर असलेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ झालेल्या रेन ट्री वृक्षाला धक्का बसला. दुपारी 12.10 वाजता महाकाय वृक्ष भाऊसिंगजी रोडवरील सर्किट बेंचच्या दिशेने एका बाजूला कलत असल्याचे सुरक्षारक्षक, सर्किट बेंचच्या प्रवेशद्वारावर कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, पोलिसांच्या निदर्शनास आले. संभाव्य धोका ओळखून मार्गावरील वाहतूक बंद करण्याची त्यांची धडपड सुरू असतानाच क्षणार्धात भला मोठा वृक्ष सर्किट बेंचच्या दिशेने कोसळला. मोठा आवाजांसह प्रचंड धूळ उडाल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाली.

मदतीसाठी तत्काळ पथके दाखल

प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेल्या शहर वाहतूक शाखेतील क्रेन चालक, कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दल, सर्किट बेंचच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांनी महापालिका, अग्निशमन दल, उद्यान विभागासह महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे, अग्निशमन दलाचे अधिकारी मनीष रणभिसे, जयवंत खोत, ओंकार खेडकर, अमोल पाटील यांच्यासह त्यांचे पथक दाखल झाले. युद्ध पातळीवरून मदतकार्य सुरू झाले.

फांद्या तोडून जखमींना बाहेर काढले, रुग्णालयात हलविले

वृक्षाच्या फांद्या तोडून कर्मचाऱ्यांनी जखमी गृहरक्षक दलाचे जवान तानाजी पाटील व सतीश जाधव यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविले. तानाजी पाटील यांच्या डोक्याला, चेहऱ्याला व हात-पायाला तर सतीश जाधव यांच्या पाठीला इजा झाल्याचे सांगण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

उपमहापौर अक्षय जरग यांच्यासह अधिकाऱ्यांकडून जखमींची विचारपूस

सीपीआर रुग्णालय आवारातील वृक्ष कोसळून दुचाकीस्वार जखमी झाल्याचे समजताच उपमहापौर अक्षय जरग, महापौर रूपाराणी निकम यांचे पती संग््रााम निकम, उद्यान अधीक्षक, विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली. जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेची चौकशी करून दोषी ठेकेदार व जेसीबी चालकावर कारवाई करण्यात येईल, असे उपमहापौर जरग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

उद्यान अधीक्षकांची सूचना डावलून ठेकेदाराकडून खोदाई सुरूच

शासकीय रुग्णालय आवारात विशेषत: संरक्षक भितीलगत असलेले सर्वच वृक्ष 50 ते 70 वर्षांपूर्वीचे आहेत. रेन ट्री किमान शंभर वर्षांचे असावेत, असा मनपा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. संरक्षक भितीच्या कामासाठी वृक्षालगत धोकादायकपणे खोदाई केली जात असल्याचे मनपा उद्यान अधीक्षकांच्या निदर्शनास आले. संबंधित अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी ठेकेदारांसह जेसीबी चालकाला काम थांबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेकडे कानाडोळा करून खोदाईचे काम करण्यात आल्याची तक्रार मनपा अधिकाऱ्यांतून केली जात आहे.

ठेकेदार, जेसीबी चालकांवर गुन्हा दाखल करणार : पोलिस निरीक्षक कण्हेरकर

रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीलगत खोदाई करताना ठेकेदारासह जेसीबी चालकाने खबरदारी घेण्याची आवश्यकता होती. जेसीबी मशिनद्वारे वृक्षाच्या बुंध्याजवळ खोदाई करण्यात आल्याने जमिनीतील मुळे कमकुवत झाल्याचे दिसून येत असतानाही ठेकेदाराने खबरदारी घेतली नाही. सीपीआर रुणालय आणि सर्किट बेंच हा वर्दळीचा आणि संवेदनशील परिसर असताना प्राथमिक चौकशीत ठेकेदारासह जेसीबी चालकाचा निष्काळजीपणा दिसून येतो. यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. चौकशीअंती संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे श्रीराम कण्हेरकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news