

कोल्हापूर : बाजार समितीच्या वतीने सध्या भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा, गूळ यासारख्या नियंत्रित वस्तूंवर सेस आकारण्यात येतो. आता बाजार समितीच्या आवारात रवा, मैदा, तेल, डाळी यासारख्या अनियंत्रित वस्तूंवर देखील मंजूर उपविधीनुसार सेस आकारण्यात येणार आहे. त्यामुळे बाजार समिती आणि व्यापारी यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
शेतकर्यांच्या मालाच्या किमतीला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. कोल्हापूरला गुळाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. यामध्ये उलाढाल कोट्यवधीची उलाढाल असते. यावर सेस आकारला जातो. अलीकडील शाहू मार्केट यार्डमध्ये गुळापेक्षा कांदा, बटाट्यावर होणारी उलाढाल वाढली आहे. बाजार समितीचे हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. अलीकडील काळात भाजीपाला, फळे, ड्रायफ्रूटची उलाढालही मोठी होऊ लागली आहे. या सर्व वस्तूंवर बाजार समितीच्या वतीने एक टक्का सेस वसूल केला जातो.
बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सभापतिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सूर्यकांत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. सभापती झाल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसांत कर चुकविणार्या दोन मोठ्या व्यापार्यांवर कारवाई करत दंडाची चांगली रक्कम वसूल केली होती. आता अनियंत्रित असणार्या मालावरही त्यांनी सेस आकारण्याचा त्यांचा विचार आहे. बाजार समितीच्या आवारात आता भाजीपाला, गूळ, कांदा, बटाट्यासह रवा, मैदा, डाळी, तेल यांचाही व्यापार सुरू आहे. यांना अनियंत्रित वस्तू असे म्हटले जाते. अनियंत्रित वस्तूंची यादी तशी मोठी आहे. या सर्व वस्तूंवर एक टक्का सेस आकारण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, याला व्यापारीवर्गातून विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.