

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे ठेवली आहेत. सभापतिपदी सूर्यकांत पाटील (रा. बाचणी, ता. कागल), तर उपसभापतिपदी राजाराम चव्हाण (रा. येळवण जुगाई, ता. शाहूवाडी) यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून सहकारी संस्था शहर उपनिबंधक डॉ. प्रिया दळणर होत्या.
सभापती, उपसभापतिपदाचे नाव आघाडीच्या नेत्यांनी रविवारी निश्चित करून त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या बंद पाकिटात घालून दिल्या होत्या. नावाचे हे पाकीट घेऊन दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, किसन चौगुले व भैया माने बाजार समितीमध्ये आले. संचालकांसमोर पाकिटातील नावांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये सभापतिपदासाठी सूर्यकांत पाटील व उपसभापतिपदासाठी राजाराम चव्हाण यांच्या नावाच्या चिठ्ठ्या होत्या. त्यानुसार दोघांचे अर्ज भरण्यात आले. सभापतिपदासाठी पाटील यांना मावळते अध्यक्ष प्रकाश देसाई सूचक, तर संदीप वरंडेकर अनुमोदक आहेत. उपसभापतिपदासाठी चव्हाण यांचे नाव सुयोग वाडकर यांनी सुचविले, तर सोनाली पाटील यांनी अनुमोदन दिले. सभापती, उपसभापतिपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी डॉ. दळणर यांनी जाहीर केले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ‘गोकुळ’चे अध्यक्षपद कागल तालुक्यात मुश्रीफ यांच्या घरातच आहे. बाजार समितीच्या सभापतिपदी सूर्यकांत पाटील यांची निवड करून जिल्ह्यातील या संस्थेचा कारभारदेखील कागल तालुक्याच्या हातात ठेवला. निवडीनंतर शेखर देसाई, शिवाजी पाटील, सुयोग वाडकर, कुमार आहुजा, नंदकुमार वळंजू, बाळासाहेब पाटील यांनी अभिनंदनपर भाषणे करताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे, तसेच बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. केवळ येऊन न जाता कामाची विभागणी करून प्रत्येक संचालकांकडे जबाबदारी द्यावी, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
सभापतिपदी निवड झाल्यानंतर सभापती सूर्यकांत पाटील यांनी, मिळणार्या कालावधीत बाजार समितीचे उत्पन्न 25 कोटींवर नेणार, असा संकल्प करत मार्केट यार्डमधील अतिक्रमण काढणार, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर बाजार समिती ही अव्वल करण्याचा आपला प्रयत्न राहील. नेत्यांसह संचालकांना मान खाली घालावयास लागणार नाही, असे कोणतेही काम आपल्याकडून होणार नाही. शेतकर्यांना, व्यापार्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी व्यापार्यांनीही आपला सेस प्रामाणिकपणे भरून सहकार्य करावे. शाहू सांस्कृतिक मंदिराबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल.
सभापतिपदी निवड झाल्यानंतर सूर्यकांत पाटील यांची बाचणी (ता. कागल) गावात जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. डॉल्बीच्या दणदणाटात, गुलालाची उधळण आणि आतषबाजी करत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.