Kolhapur Crime : कॉलेजमधील प्रेमाने बांधली लगीन गाठ; संशयाच्या सुईने केला घात

गणेश व दीपालीचा दहा वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह; चारित्र्याच्या संशयाने संसार उद्‌ध्वस्त
Kolhapur Crime News
Kolhapur Crime News
Published on
Updated on

धीरज बरगे

कोल्हापूर : गणेश व दीपाली मंगळवार पेठेतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. शिक्षण घेताना दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. कॉलेजमधील प्रेमाने या दोघांची लगीन गाठ बांधली खरी, पण लग्नाच्या आठ वर्षांनंतर संशयाच्या सुईने त्यांचा घात केला. पती गणेशने चारित्र्याच्या संशयावरून दीपालीचा खून केला आणि त्यांचा संसार उद्‌ध्वस्त झाला.

गणेश हा मूळ जवाहरनगर येथील चर्च परिसरात राहतो. त्याच्या घरच्यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असल्याचे समजते. तर दीपाली ही योगेश्वरी कॉलनी येथेच राहावयास होती. दोघेही मंगळवार पेठेतील एका महाविद्यालयात शिकायला होते. महाविद्यालयात त्यांची ओळख झाली आणि काही दिवसांनी या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः दहा वर्षांपूर्वी त्यांनी विवाह केला.

पळून जाऊन केला विवाह

गणेश व दीपालीच्या विवाहाला त्यांच्या घरच्यांची परवानगी नव्हती. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन विवाह केला होता. विवाहनंतर गणेशला घरच्यांनी घरी घेतले. काही दिवस दोघे त्यांच्या जवाहरनगर येथील घरी राहायला होते, पण घरच्यांसोबत पटत नसल्याने गणेश व दीपालीने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते सुरुवातीला काही दिवस जरगनगर येथे तर त्यानंतर गेली दीड वर्ष ते दोघे योगेश्वरी कॉलनी येथे दीपालीच्या घराशेजारीच भाड्याने घर घेऊन राहत होते.

चुकीचं केलं रे

दीपालीच्या खुनानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत होती. दीपालीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून शेजारीही भेदरून गेले होते. चुकीचं केलं रे, अशी भावुक प्रतिक्रिया त्यांच्यामधून व्यक्त होत होती.

स्वरा व श्री आईच्या मायेला पोरकी

मुलगी स्वरा ही इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे, तर मुलगा श्री हा चार वर्षांचा आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी दोघेही नोकरी करत होते. साधारण सात ते आठ वर्षे त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. मात्र गेल्या दीड ते दोन वर्षांपासून गणेश हा दीपालीवर संशय घेत होता. यामधून दोघांमध्ये वारंवार वाद सुरू असायचे. रविवारी त्यांच्यामध्ये झालेल्या वादाने टोकाचे पाऊल उचलले आणि गणेशच्या हातून दीपालीचा खून झाला. दीपालीच्या मृत्यूने स्वरा व श्री ही चिमुरडी आईच्या मायेला पोरकी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news