

जयसिंगपूर : गुजरात येथील वनतारा केंद्रात महादेवी हत्तीणीची रविवारी वैद्यकीय तपासणी करून अहवाल संयुक्त पथकाने उच्चस्तरीय समितीकडे (एचपीसी) सादर केला. आता याबाबतचा निर्णय 29 नोव्हेंबरच्या सुनावणीत होणार आहे. दरम्यान, महादेवीला पाहून नांदणी मठाचे माहुत व मठ प्रतिनिधींना अश्रू अनावर झाले.
वनतारा येथे उच्चस्तरीय समिती (एचपीसी), राज्य शासन, नांदणी मठ आणि वनतारा संस्थेच्या संयुक्त पाहणी करण्यात आली. यात एचपीसीचे डॉ. एन. एस. मनोहरण, मठाचे डॉ. एस. कल्लाप्पा, पेटाचे डॉ. निनी अरवींदन, वनताराचे निरज संगवान, नांदणी मठाचे माहुत ईस्माईल, डॉ. सागर पाटील, शिरीष हेरवाडे यांनी संयुक्तरित्या पाहणी केली. प्रथम मठाचे माहुत ईस्माईल, डॉ. सागर पाटील व नांदणीचे पदाधिकारी यांनी महादेवी हत्तीणीला पाहताच अश्रू अनावर झाले. त्यानंतर माहुत महादेवी हत्तीणीला पाहून मिठी मारली. त्यानंतर महादेवी हत्तीणीने सोंडाने तोंडावर व हातावर फिरवून आनंद व्यक्त केला.
दरम्यान, 22 ऑक्टोबर रोजी एचपीसीसमोर सुनावणी झाली होती. यात महादेवी हत्तीणीची वैद्यकीय तपासणी करून परवानगीसाठी 20 दिवसांची मुदत दिली होती. त्याप्रमाणे संयुक्त पथकाने गुजरात येथील वनतारा महादेवी हत्तीणीची वैद्यकीय तपासणी करून याचा अहवाल संयुक्त पथकाने एचपीसीकडे सादर केला. पुढील कार्यवाहीबाबतचा निर्णय 29 नोव्हेंबरच्या सुनावणीत होणार आहे.