Kolhapur Lok Sabha Election 2024 : प्रतीक्षा 24 तासांची ; उत्कंठा शिगेला

Kolhapur Lok Sabha Election 2024 : प्रतीक्षा 24 तासांची ; उत्कंठा शिगेला
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि हातकणंगलेचा नवा खासदार कोण? लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? याच्या उत्तरासाठी आता केवळ 24 तासांचीच प्रतीक्षा आहे. निकालासाठी मतदारांसह कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला गेली आहे. मंगळवारी (दि. 4) सकाळी आठ वाजता दोन्ही मतदारसंघांच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, सोमवारी (दि. 3) दुपारी तीन वाजता मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीची रंगीत तालीम होणार आहे.

कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा व टपाली मतदानासाठी प्रत्येकी एक अशा प्रत्येकी सात मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. कोल्हापूरसाठी 349, तर हातकणंगलेसाठी 337 कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त केले आहेत. त्यांचे दुसरे प्रशिक्षण सोमवारी (दि. 3) दुपारी तीन वाजता प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रांवर होणार आहे.

अशी होईल मतमोजणी

सकाळी सहा वाजता सर्व अधिकारी, मतमोजणी कर्मचारी मतमोजणी केंद्रांवर उपस्थित राहतील. यानंतर कर्मचार्‍यांचे 'रान्डमायझेशन' होईल. त्यानुसार कर्मचार्‍यांना कोणत्या टेबलवर नियुक्त केले, हे स्पष्ट होईल. त्यानुसार संबंधित कर्मचारी टेबलवर जातील. सकाळी सात वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँगरूमचे सील काढण्यात येईल. सकाळी आठ वाजेपर्यंत पोस्टातून आलेले टपाली मतदान स्वीकारले जाईल. यानंतर सर्व टपाली मतपत्रिका टपाली मतमोजणी केंद्रांत एकत्र केल्या जातील. सैनिक मतदारांच्या मतपत्रिकांचे स्कॅनिंग सुरू होईल. सकाळी आठ वाजता मतदारसंघनिहाय, मतदान केंद्र क्रमांकानुसार प्रत्येकी 14 ईव्हीएम टेबलवर आणून ठेवली जातील. सकाळी साडेआठ वाजता (अन्यथा निवडणूक निरीक्षकांनी परवानगी दिल्यानंतर टपाली मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पाच-दहा मिनिटांनी) ईव्हीएमवरील मतमोजणीला सुरुवात होईल.

कोल्हापूरसाठी 31; हातकणंगलेसाठी 24 फेर्‍या

मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल असतील. कोल्हापूर मतदारसंघासाठी 31 फेर्‍या होतील. हातकणंगले मतदारसंघासाठी 24 फेर्‍या होतील. यानंतर टपाली मतदानाच्या एका फेरीचा अंतिम आकडेवारीत समावेश होईल.

प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजणार

प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅट मशिन उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून निश्चित केले जातील. त्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जातील. ईव्हीएममधील मतमोजणी झाल्यानंतर टेबल क्रमांक 14 वर दोन्ही मतदारसंघांतील एकूण 60 व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत.

अंतिम निकाल सायंकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 मतदान केंद्रांची एक, तर लोकसभा मतदारसंघात 84 मतदारसंघांची एक अशी फेरी होईल. पहिली फेरी जाहीर होण्यास सुमारे साडेनऊ वाजतील. त्यानंतर मात्र अर्ध्या तासाला एक फेरी पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुपारी एक वाजेपर्यंत कल स्पष्ट होईल. टपाली मतमोजणी तीन ते चार वाजेपर्यंत पूर्ण होईल. अंतिम आकडेवारीसह निकाल सायंकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

मतमोजणीच्या ठिकाणी सुविधा

मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक, उमेदवार व निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था, पुरेसा वीजपुरवठा व जनरेटर बॅकअप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा असणार आहे. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक सुविधा, पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. स्वच्छतागृह, प्राथमिक वैद्यकीय सेवा असणार आहे.

मतमोजणी केंद्र परिसरात उद्या वाहतुकीला बंदी

मतमोजणी केंद्रांच्या परिसरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. रमणमळा आणि राजाराम तलाव परिसरातील निवडणूक कामाशी संबंधित वाहने वगळता अन्य नियमित वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी दोन्ही मतमोजणी केंद्रांच्या परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

हे मार्ग राहणार बंद

1. महावीर कॉलेज ते पोलिस अधीक्षक कार्यालय. 2. पितळी गणपती चौक ते पोलिस अधीक्षक कार्यालय. 3. चार नंबर फाटक ते पोलिस अधीक्षक कार्यालय. 4. धोबी कट्टा ते रमणमळा धान्य गोदाम (जाता-येता). 5. सरनोबतवाडी अंडर ब्रिज ते शिवाजी विद्यापीठ. 6. शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी.

या मार्गांचा वापर करावा

1. महावीर कॉलेज-जिल्हाधिकारी कार्यालय, सर्किट हाऊस. 2. चार नंबर फाटक- लाईन बाजार-सर्किट हाऊस- धैर्यप्रसाद हॉल- सोयीनुसार पुढे मार्गस्थ. 3. यशवंत सोसायटी-पोवार मळा-शंभर फुटी रोड. 4. रमणमळा, 100 ठाण, जावडेकर सोसायटी, छत्रपती शाहू हायस्कूल परिसर, पोलो ग्राऊंड ते महावीर कॉलेज. 5. सरनोबतवाडी ते पुणे-बगंळूर- शाहू टोलनाका-शिवाजी विद्यापीठ

या ठिकाणी असणार पार्किंगची व्यवस्था

अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी- पोलिस मुख्यालय गार्डनसमोरील रिकामी जागा आणि पोलिस फुटबॉल ग्राऊंड. निकाल पाहण्यासाठी येणार्‍यांची वाहने- रेणुका मंदिर पाठीमागील बाजू 100 फुटी रोडवर (दुचाकी व चारचाकीकरिता), 4 नं. शाळेचे मैदान (दुचाकीकरिता), शिंदे नर्सरीसमोरील पलीकडील आत जाणार्‍या रस्त्याच्या डाव्या बाजूस (चारचाकीकरिता). मेरी वेदर मैदानावर (दुचाकीकरिता), सेंट झेव्हियर्स शाळा मैदान (दुचाकीकरिता), होमगार्ड कार्यालय मैदान (दुचाकीकरिता).

मतमोजणीसाठी आलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांच्या वाहनांसाठी- राजाराम तलाव येथील मतमोजणी ठिकाणच्या समोरील रिकाम्या जागेत (रस्त्याच्या पलीकडे). निकाल पाहण्यासाठी येणार्‍यांची वाहने- युको बँकेशेजारील रिकामी जागा, शिवाजी विद्यापीठ नवीन म्युझियम इमारतीशेजारील मोकळी जागा. नॅनो सायन्स, वृत्तपत्र इमारतीसमोरील मोकळी जागा. एच. पी. गॅस गोडावूनसमोरील रिकामी जागा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news