

कोल्हापूर ः नवे वर्ष नव्या नेतृत्वाची मुहूर्तमेढ करणारे ठरणार आहे. या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असून त्यातून नवे नेतृत्व आकाराला येणार आहे. कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका, कोल्हापूर जिल्हा परिषद, 12 पंचायत समित्या, दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींच्या 615 जागांसाठी या निवडणुका होत आहेत. थेट नगराध्यक्ष निवडीने पुढील विधानसभेसाठी उमेदवार तयार होणार आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाठोपाठ आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे वेध सरकारला लागले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुकांबाबत निर्णय होईल. तोवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपने यापूर्वीच आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश देऊन नव्या वर्षात सदस्य नोंदणी सुरू केली आहे. महायुती व महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षही तयारीला लागले आहेत.
कोल्हापूर महापालिकेत 81 नगरसेवक होते. इचलकरंजी नगरपालिकेत 72 नगरसेवक होते. इचलकरंजी आता महापालिका झाली असून महापालिकेची पहिलीच निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात दहा नगरपालिका आहेत. त्यापैकी जयसिंगपूर नगरपालिका वगळता अन्य 9 नगरपालिकेत 17 निवडून आलेले व 2 स्वीकृत नगरसेवक असून नगराध्यक्ष निवडणूक थेट जनतेतून घेतली जाते, तर जयसिंगपूर नगरपालिकेत 21 निवडून आलेले व 2 स्वीकृत अशी सदस्य संख्या आहे. जिल्ह्यात तीन नगरपंचायती आहेत. तेथे 2 नगरपंचायतीत 17 निवडून आलेले व दोन स्वीकृत, तर एका नगरपंचायतीत 20 निवडून आलेले व 2 स्वीकृत अशी सदस्यसंख्या आहे. या प्रत्येक ठिकाणी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जात आहे. त्याशिवाय जिल्हा परिषदेचे 67 सदस्य असून जिल्ह्यात 12 पंचायत समित्या असून तेथे एकूण सदस्यसंख्या 133 आहे. अशा एकूण 615 जागांवर निवडणूक होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात काँग्रेसचे एक, शिवसेना शिंदे गटाचे एक असे लोकसभेचे तर भाजपचे राज्यसभेचे एक खासदार आहेत. जिल्ह्यात दहाच्या दहा आमदार महायुतीकडून विधानसभेवर निवडून गेले आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील आमदार हे काँग्रेसचे आहेत. विधानसभेत भाजपचे एका समर्थकासह तीन, शिवसेना शिंदे गटाचे तीन, जनसुराज्यचे दोन, शिंदे समर्थक राजर्षी शाहू आघाडी एक व अजित पवार राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेना यांचे विधानसभेतील संख्याबळ शून्य आहे.
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक चौरंगी मतदारसंघ होणार असल्याने आसपासच्या चार प्रभागांत वजन असलेला उमेदवार निवडून येऊ शकतो. तसेच ग्रामीण भागात साखर कारखाने आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून तरुणांची नवी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. तेही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून नेतृत्व करण्याची तयारी करीत आहेत, तर थेट नगराध्यक्ष निवडीने गेल्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांत विधानसभेसाठी तयार उमेदवार मिळाले. त्यामुळे थेट निवडून आलेले नगराध्यक्षही नेतृत्वाच्या शर्यतीत उतरतील. त्यामुळे तरुणांचा नवा संच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नेतृत्व करण्यासाठी पुढे येणार आहे.