

नानीबाई चिखली : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 21 व्या पशुगणनेच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. गणना करणारे अधिकारी त्यामध्ये सहभागी होणार आहेत. पुढील पाच ते सहा महिन्यांपर्यंत सर्वेक्षण होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर यासाठी पदवीधारकांना प्रगणक म्हणून नेमले जाणार आहे.
सरकारकडून राबवल्या जाणार्या योजना आणि प्रकल्प, दुधाचे उत्पादन, दुधाच्या कमी- जास्त होणार्या किमती, राज्यातील एकूण पशुधन आणि त्याचे व्यवस्थापन या सर्व गोष्टींसाठी पशुगणना महत्त्वाची असते. दर पाच वर्षांनी देशभरातील पशुधनाची गणना करण्यात येते. 2019 मध्ये शेवटची म्हणजेच 20 वी पशुगणना झाली होती.
शहरामध्ये चार हजार व ग्रामीणमध्ये तीन हजार घरांमागे एक प्रगणक याप्रमाणे प्रगणकांची नियुक्ती केली जाणार आहे. शासकीय कर्मचारी, अधिकार्यांना या सर्वेक्षणात प्राधान्य दिले जाणार आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून ही पशुगणना करण्यात येणार आहे. यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांना माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक घरी जाऊन या विकसित मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्रगणक गणना करणार आहेत. त्यासाठी मोबाईल अॅपमध्ये प्राण्यांच्या 219 प्रकराच्या पशुधनाच्या जातींची गणना होणार आहे. प्रगणक मोबाईलमधील अॅपद्वारे गणना करतील, प्राण्यांची वर्गवारी, जात यासंदर्भातील छायाचित्रासह माहिती अॅपमध्ये असणार आहे. पाळीव कुत्रे, भटके कुत्र्यांची माहिती नोंदवली जाणार आहे. तसेच, दूध डेअरी, मटण व चिकन विक्रीच्या दुकानांसह त्यांच्याकडील माहितीची नोंद होणार आहे.