Kolhapur Leopard : वारणा कापशी शिवारात बिबट्याचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

शिवारात शेतीची कामे अंतिम टप्प्यात, शेतकऱ्यांच्या जिवाला धोका
Leopard file photo
Leopard file photoPudhari
Published on: 
Updated on: 

​बांबवडे : वारणा कापशी ता शाहूवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. शेतात कामासाठी गेलेल्या काही ग्रामस्थांना या बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे.

​सध्या शिवारात शेतीची कामे अंतिम टप्प्यात व जोरात सुरू आहेत. अनेक ठिकाणी ऊस पिकाला पाणी देण्याचे काम सुरू आहे, तर काही भागात भात कापणीच्या कामांनी वेग घेतला आहे. अशा वेळेस मजुरांना आणि शेतकऱ्यांना दिवस-रात्र शेतात राबावे लागत आहे. परंतु, शिवारात पूर्ण वाढ झालेला बिबट्या मुक्तपणे वावरत असल्याने शेतात जाणे धोक्याचे बनले आहे.

​बिबट्याच्या या वावरामुळे शेतमजुरांनी शेतावर जाण्यास नकार दर्शवला असून, भात कापणी आणि ऊस पिकाच्या पाण्याच्या कामांवर मोठा परिणाम झाला आहे. कधीही अचानक हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

​"पिकांची कामे वेळेत होणे गरजेचे आहे, पण जीवाच्या भीतीपोटी शेतात जाणे कठीण झाले आहे. वनविभागाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा." — स्थानिक शेतकरी ​या पार्श्वभूमीवर, वनविभागाने तत्काळ वारणा कापशी शिवारात पाहणी करून बिबट्याचा शोध घ्यावा, परिसरात गस्त वाढवावी आणि आवश्यक असल्यास पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news