

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती नागाळा पार्क व ताराबाई पार्कात बिबट्याने धुमाकूळ घातला त्याला एक महिना पूर्ण होत आहे. मात्र, या महिन्याभराच्या काळात बिबट्या आला कुठून, याचा छडा लावण्यात ना वनखात्याला यश आले ना पोलिसांना. पोलिसांनीही सीसीटीव्हीच्या आधारे याचा छडा लावला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, या प्रकरणात काय आणि किती प्रगती झाली हे वन व पोलिस या सरकारच्या दोन्ही विभागांनी अजूनही जनतेला माहिती दिलेली नाही. लोकप्रतिनिधींनीही सरकारच्या या खात्यांना जाब विचारल्याची माहिती जनतेला दिलेली नाही.
भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या येऊन धुमाकूळ घालतो, चार लोकांना जखमी करतो, गर्दीने गजबजलेल्या सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जीव टांगणीला लागतो, तरी सरकारी यंत्रणांची बेफिकीरी सुरूच आहे. बिबट्या आला कसा हेच कळत नसेल, तर शहर सुरक्षित आहे का, असा सवाल आहे. सीसीटीव्हीचे जाळे सगळीकडे आहे. तरी बिबट्याचा मार्ग काढताना यंत्रणांची दमछाक का झाली? तपासात यंत्रणा का प्रगती करू शकल्या नाहीत, यांची उत्तरे मिळाली पाहिजेत.
पंधरा वर्षांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात असाच एक बिबट्या आला. त्याने धुमाकूळ घातला. रूईकर कॉलनीसह आसपासच्या परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याचाही छडा सरकारी यंत्रणांना लावता आला नव्हता. हे प्रकरण बासनात गुडाळले जाणार याची चर्चा त्याचवेळी झाली होती. आताही बिबट्याचा मार्ग काढण्यातील शिथिलता यामुळे हे प्रकरण बासनात बांधण्याच्या मार्गावरच असल्याची चर्चा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच दहशतीखाली होते. तरीही लोकप्रतिनिधींसह सर्वांची अनास्था थक्क करणारी आहे.