

कोल्हापूर : दुपारचे बारा वाजलेले... ड्युटी संपली म्हणून खुरपे आत नेऊन ठेवले... पाण्याची बाटली घेऊन गार्डनमध्ये हात धूत होतो... तेवढ्यात बिबट्याने झडप घातली... दोन्ही पंजांनी दंडाला पकडून नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला... सुमारे पंचवीस ते तीस सेकंदांच्या थरारनाट्यात अखेर जीवाच्या आकांताने प्रतिकार करून माळी कामगाराने बिबट्याला हुसकावून लावले... डोळ्यांत तीक्ष्णता, शरीरात वणवा असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात लक्ष्य ठरलेल्या आणि मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या गंभीर जखमी ‘माळी कामगाराची जीवावरची झुंज’ त्यांनी स्वतः सीपीआरमध्ये दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितली.
कदमवाडीतील तुकाराम सिद्धू खोंदल (वय 47) तीन वर्षांपासून वूडलँड हॉटेलमध्ये माळीकाम करतात. मंगळवारी (दि. 11) सकाळी 9 वा. कामावर आले. नेहमीप्रमाणे गार्डनमधील झाडांचे कटिंग व इतर कामे केली. काम संपल्यानंतर खुरपे नेऊन ठेवले. चिखलमातीचे हात धुण्यासाठी पाण्याची बाटली घेऊन गार्डनमध्य गेले. तेवढ्यात बिबट्याने कंपाऊंडवरून गार्डनमध्ये उडी मारली. क्षणभरात भीतीचे सावट दाटून आले. निसर्गही कधी कधी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय जीवन बदलून जातो आणि तेही फक्त काही सेकंदांत याचा अनुभव त्यांना आला.
बिबट्याने पहिल्यांदा खोंदल यांच्या चेहऱ्यावरच झडप टाकली. गळा पकडण्याचा प्रयत्न केला. यात खोंदल यांच्या उजव्या गालावर बिबट्याचे दोन दात खोलवर घुसले. खोंदल यांना काय झाले काहीच कळाले नाही. परंतु जीव वाचविण्यासाठी खोंदल धडपड करू लागले. गुरगुरण्यामुळे बिबट्या असल्याचा अंदाज खोंदल यांना आला. त्यांनी बिबट्याला जोरदार प्रतिकार केला. परंतु बिबट्याचा त्यांच्यावर हल्ला सुरूच होता.
बिबट्याने पुढे पंज्याने वार केला. खोंदल सुटण्याचा प्रयत्न करू लागले. सुमारे तीस सेकंद हा थरार सुरू होता. ती वेदना, ते घाबरणं, तो क्षण. पण त्याहीपेक्षा मोठे होते ते खोंदल यांच्यासाठी जगण्याचे भान. मी जर थांबलो तर संपलो, हा एकच विचार क्षणात मनात आला आणि त्यानंतर सुरू झाली जीवाची झुंज. त्यांच्या हातात पाण्याची बाटली होती. तीच त्यांची शस्त्र झाली. बिबट्याच्या प्रत्येक झेपेला प्रतिकार केला. आरडाओरड, भीती, यातना आणि जिद्द यांचा प्रचंड संघर्ष सुरू होता. ही झुंज फक्त काही सेकंदांची होती. पण त्या सेकंदानंतर खोंदल यांनी जीवन पुन्हा जिंकले. खोंदल यांचा प्रतिकार पाहून बिबट्या मागे हटला आणि पळून गेला.
हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने खोंदल यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. खोंदल यांचा जीव वाचला. पण पुढची परीक्षा भावनिक होती. खोंदल यांच्या चार मुली प्रियांका, सारिका, रूपाली आणि दीपाली यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. कित्येकवेळा जिद्दीने जगण्यासाठी लढणाऱ्या पप्पांना प्रथमच अशा अवस्थेत पाहात होत्या. चेहऱ्यावर, हातावर जखमा आणि डोळ्यात अजूनही त्या झुंजीची सावली. मुलींच्या नजरा पप्पांच्या चेहऱ्यावर खिळल्या. एका क्षणात सगळ्या भावना बाहेर आल्या. अश्रू थबकले नाहीत... धावले. मुलींनी पप्पांना मिठी मारली आणि खोंदल यांच्याही अश्रूंचा बांध फुटला. जगण्याची लढाई करणारा माणूस जेव्हा आपल्या प्रेमाच्या लोकांना स्पर्शतो, तेव्हा बाहेरचे धाडस भिंतीसारखे कोसळते, याचा अनुभव उपस्थितांनी घेतला.