

कोल्हापूर : एखाद्या ठिकाणी मोटारसायकल लावून कामानिमित्त संबंधित कुठेतरी जातो... थोड्या वेळाने येऊन पाहतो, तर जाग्यावर मोटारसायकल नसते... जरा इकडे-तिकडे पाहतो... तरीही मोटारसायकल कुठे दिसत नाही... मग धापा टाकतच पोलिस ठाणे गाठले जाते... मोटारसायकल चोरीला गेल्याचे सांगितले जाते... थोडे शोधा, मग बघू असे सांगतात... अखेर कुठे न मिळाल्यानंतर एफआयआर दाखल होते... पण वर्षानुवर्षे उलटली तरी मोटारसायकल मिळत नाही... अशाप्रकारे कोल्हापूर जिल्ह्यात मोटारसायकल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याने पोलिसही हतबल झाले आहेत. चोरट्यांचा वेग बुलेटसारखा झाला असून पोलिसांच्या तपासाचा वेग सायकलसारखा आहे.
शहरी भागात सर्वाधिक फटका
कोल्हापूर शहर, कागल, शिरोळ, गडहिंग्लज, इचलकरंजी या भागांत सर्वाधिक मोटारसायकली चोरीला जात आहेत. कोल्हापूर शहरातील एस. टी. स्टँड, रेल्वे स्टेशन, लक्ष्मीपुरी, मंगळवार पेठ याबरोबरच बाजारपेठा चोरट्यांचे टार्गेट पॉईंट ठरले आहेत. कामानिमित्त घराबाहेर पार्क केलेल्या गाड्या किंवा सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या दुचाकी अगदी काही मिनिटांत गायब होत आहेत. महिन्याला शेकडो दुचाकी चोरीला जात असल्याने वाहनधारकांत प्रचंड असुरक्षिततेची भावना पसरली आहे.
पोलिस हतबल...
चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांत असंतोष आहे. पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या जातात, पण तपास मात्र अनेकदा निष्फळ ठरतो. चोरटे वाहन क्रमांक बदलतात, इंजिन-चेसिस क्रमांक घासून काढतात आणि वाहन इतर जिल्ह्यांत विकतात. त्यामुळे चोरी झालेली गाडी परत मिळवणे कठीण होते.
नागरिकांमध्ये संताप...
गाड्या चोरीला गेल्यानंतर अनेकांचा रोजगार बुडतो. नोकरदार, व्यावसायिक, कामगार यांचे दैनंदिन कामकाज ठप्प होते. विमा नसलेल्या गाड्यांची हानी अधिक होते. नागरिकांमध्ये पोलिसांविषयी प्रचंड नाराजी आहे. ‘गाड्या गायब होतात, पण पोलिस फक्त तक्रार लिहून घेतात. काहीच कारवाई होत नाही,’ अशी प्रतिक्रिया अनेक वाहनधारक देत आहेत.
चोरीच्या पद्धती
वाहन चोरट्यांकडे आता आधुनिक तंत्रज्ञान आहे. डुप्लिकेट चावी, लॉक तोडण्याची साधने, अगदी ऑन-द-स्पॉट ‘जम्प स्टार्ट’ करून वाहन घेऊन जाण्याच्या घटना घडत आहेत. अनेक चोरटे बॅटरी आणि पेट्रोल चोरी करून वाहन काही अंतरावर टाकून देतात, तर काही थेट संपूर्ण मोटारसायकल घेऊन इतर जिल्ह्यांत विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कठोर पावले उचलण्याची गरज
कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे. महिन्याला शंभरावर मोटारसायकली चोरीला जात असल्याने पोलिस यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. काही उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी चोरट्यांच्या टोळ्यांचा वाढता आत्मविश्वास धोक्याची घंटा ठरत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षितता मिळण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.