

कोल्हापूर : कंपन्यांमध्ये मजूर पुरविण्याचा ठेका भागीदारीत घेण्याच्या बहाण्याने महावीर गजानन मूग (वय 78, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) यांची 31 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार 19 सप्टेंबर 2020 ते पाच ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला.
याबाबत मूग यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशाने शाहूपुरी पोलिसांनी संजय रामचंद्र वाडेकर (सध्या रा. खारघर, नवी मुंबई, मूळ रा. बेलोरी, जि. यवतमाळ) याच्यावर गुन्हा दाखल केला. मूग हे कोल्हापुरातील एका कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचा अभियंता मुलगा मुंबईत खासगी कंपनीत नोकरी करतो. मुलाचा मित्र वाडेकर याने सप्टेंबर 2020 मध्ये मूग यांना संपर्क करून मुंबईतील दोन मोठ्या कंपन्यांमध्ये मजूर पुरविण्याचा ठेका मिळत असल्याचे त्यांना सांगितले. व्यवसायातून दरमहा मोठी रक्कम परत करेन असे आमिष त्याने दाखवले.
मूग यांनी वर्षभरात सात वेळा वाडेकरच्या दोन बँक खात्यांवर 31 लाख 50 हजार रुपये पाठवले. करार करण्यास टाळाटाळ करीत त्यांची फसवणूक केली.