

कोल्हापूर : लहान मुलांच्या भांडणातून केलेल्या चाकूहल्ल्यात यासीन जहाँगीर मोमीन (वय 32, रा. 12 वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) हे जखमी झाले. याप्रकरणी माजी नगरसेवक पुत्र धनराज प्रदीप पोवार (49, रा. 13 वी गल्ली, राजारामपुरी) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. ही घटना रविवारी (दि. 7) घडली.
जखमी मोमीन व संशयित पोवार यांची मुले एकाच शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेतात. मुले खेळत असताना त्यांच्यात टक्कर झाली. संशयित पोवार याच्या मुलाला डोळ्याजवळ इजा झाली. रुग्णालयात त्याच्यावर टाके घालण्यात आले. मुलांच्या भांडणाचा राग मनात ठेवून संशयित धनराज पोवार याने मोमीन यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. गालावर खोलवर जखम झाली. गंभीर जखमी झालेल्या मोमीन यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. लहान मुलांमधील भांडणात संशयिताने केलेल्या चाकूहल्ल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.