

चंदगड : पाटणे वनपरिक्षेत्राच्या हद्दीत तुडयेपासून काही अंतरावर असलेल्या खालसा म्हाळुंगे-मलगड (ता. चंदगड) येथे वनपथकाने छापा टाकून एका घरातून जिवंत कासव आणि साळींदराचे मांस जप्त केले. साळींदराची शिकार करून त्याचे मांस शिजविले जात असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, दोघे जण घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
याप्रकरणी पुंडलिक निंगाप्पा गुरव (वय ४६, सध्या रा. खालसा म्हाळुंगे-मलगड, ता. चंदगड, मूळ रा. गोल्याळी, ता. खानापूर, जि. बेळगाव), देवाप्पा बाबू कुलम (वय ३४), रामलिंग धोंडीबा गवस (वय ३९) आणि तुकाराम शंकर गावडे (वय ४०, तिघेही रा. गोल्याळी, ता. खानापूर, जि. बेळगाव) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनपथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे मलगड येथील एका घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी घरामध्ये जिवंत कासव पकडून ठेवलेले आढळून आले. तसेच साळींदराची शिकार करून त्याचे मांस शिजविले जात असल्याचे निदर्शनास आले. वनपथकाची कारवाई सुरू असताना यातील दोघे जण घटनास्थळावरून पसार झाले.
कारवाईदरम्यान वनपथकाने जिवंत कासव, साळींदराचे शिल्लक मांस, शिकारीचे साहित्य, मोबाईल फोन तसेच मांस शिजविण्यासाठी वापरलेली भांडी असा एकूण १ लाख ९८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पाटणे वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल शितल पाटील, वनपाल वर्षदा पावसकर, जॉन्सन डिसोजा, बाळासाहेब भांडकोळी, वनरक्षक श्रेयश रायके यांच्यासह अन्य वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. घटनास्थळावरून फरार झालेल्या दोन्ही संशयितांचा वनविभागाकडून शोध सुरू आहे.