सूर्यास्ताच्या किरणांचा अंबाबाईला मस्तकाभिषेक

किरणोत्सव होताच गाभारा उजळला; 2 फेब्रुवारीपर्यंत किरणोत्सवाची पर्वणी
Kolhapur News
सूर्यास्ताच्या किरणांचा अंबाबाईला मस्तकाभिषेक
Published on
Updated on

कोल्हापूर : क्षितिज रेषेवर अस्ताला जाणार्‍या सूर्यास्ताची केशरी झाक असलेली लख्खं किरणांची तिरीप एकेक मिनिटांचे अंतर पार करत पुढे सरकत होती. कधी मावळत्या सूर्याकडे, तर कधी अंबाबाईच्या मूर्तीकडे भाविकांची नजर वळत होती. सूर्य जसजसा अस्ताकडे निघाला तशी या किरणांची पावले अंबाबाईच्या गाभार्‍याकडे सरकत होती. अखेर सायंकाळी सहा वाजून 17 मिनिटांच्या ठोक्याला मावळतीच्या किरणांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला मस्तकाभिषेक केला. महाद्वार ते अंबाबाईची गर्भकुडी हा किरणोत्सव सोहळ्याचा एक तासाचा काळ भाविकांनी अक्षरश: डोळ्यात साठवला.

अंबाबाई मंदिरात वर्षातून दक्षिणायन व उत्तरायण अशा दोन पर्वात किरणोत्सव सोहळा होतो. यंदाच्या उत्तरायण किरणोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली. किरणोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारी पाच वाजून 20 मिनिटांनी किरणांनी महाद्वारात प्रवेश केला. त्यानंतर गणपती मंदिरामागून कासव चौकात किरणांचा प्रवेश झाला. सहा वाजून दोन मिनिटांनी किरणांनी पितळी उंबरा पार केला. चांदीचा उंबरा ओलांडून किरणे कटांजनापर्यंत आली तेव्हा सहा वाजून 10 मिनिटे झाली होती. यावेळी पेटी चौक व गाभार्‍यातील दिवे मालवण्यात आले.

सहा वाजून 12 मिनिटांनी किरणांचा अंबाबाईला चरणस्पर्श होताच भाविकांनी ‘जय अंबे’चा जयघोष केला. किरणे देवीचा गुडघा, कमरेच्यावर सरकत होती तसा किरणोत्सवाचा क्षण जवळ येत होता. सहा वाजून 16 मिनिटांनी सूर्यकिरणांचा प्रकाश अंबाबाईच्या मुखावर पडला, तर सहा वाजून 17 मिनिटांनी देवीच्या कपाळावरील मळवट किरणांच्या प्रकाशात उजळून गेला. किरणोत्सव झाल्यानंतर घंटानाद करून देवीची आरती करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news