कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गाच्या कागल ते सातारा मार्गाच्या सहापदरीकरणाचे काम पुन्हा ठप्प झालेले दिसत आहे. एक-दोन ठिकाणांचा अपवाद वगळता बहुतेक सगळी कामे रेंगाळलेली आहेत. ही परिस्थिती विचारात घेता हे काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्याऐवजी प्रदीर्घ काळ रेंगाळण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
2014 मध्ये भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात पुणे ते कागल या महामार्गाच्या सहापदरीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार बाकीचा सगळा महामार्ग सहापदरी झाला आहे; मात्र केवळ कागल ते सातारा या 133 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचेच काम गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी रेंगाळले आहे. 2017 मध्ये या कामाच्या प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली; मात्र त्यातही पुन्हा नवनवे घोळ होत गेले. बांधकामाच्या अटी-शर्तीतील बदल, कामाचा प्रत्यक्षातील खर्च यासारख्या कारणांवरून दोन वर्षात तब्बल 22 वेळा या कामाच्या निविदेमध्ये फेरबदल करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या कामाची सूत्रे हातात घेऊन 2022 मध्ये या कामाची प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाचे सातारा जिल्ह्यातील शेंद्रे ते सांगली जिल्ह्यातील पेठनाका आणि पेठनाका ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल असे दोन टप्पे केले आहेत. यापैकी पेठ ते शेंद्रे या 67 किलोमीटर अंतराचे आणि 1,895 कोटी रुपये खर्चाचे काम अदानी बांधकाम कंपनीकडे आहे. पेठनाका ते कागल या 63 किलोमीटर अंतराचे आणि 1,502 कोटी रुपये खर्चाचे काम सोल्युशन रोडवेज, पुणे या कंपनीकडे आहे.
साधारणत:, सप्टेंबर 2022 मध्ये या महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे; पण दोन्हीही कंपन्यांचे काम इतक्या धिम्यागतीने सुरू आहे की, अजून निम्मेसुद्धा काम पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण करण्याची मुदत जानेवारी 2025 आहे; मात्र सध्याची या कामाची गती विचारात घेता आणखी किमान दोन-चार वर्षे हे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रुंदीकरणाच्या नावाखाली दोन्ही कंत्राटदार कंपन्यांनी इथला पूर्वीचा वापरात असलेला जवळपास 90 टक्के चौपदरी महामार्ग बंद करून टाकला आहे. मागील दोन वर्षांपासून या महामार्गावरून जाणार्या झाडून सगळ्या वाहनांचा प्रवास बाजूच्या सेवा रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन सुरू असल्याचे दिसत आहे.
या महामार्गावरून दररोज किमान 90 हजार ते एक लाख छोट्या-मोठ्या वाहनांची ये-जा चालते; पण जुना महामार्ग अनेक ठिकाणी कामासाठी म्हणून बंद करण्यात आल्याने या हजारो वाहनधारकांना धोकादायक सेवा रस्त्यांशिवाय पर्याय राहिलेला दिसत नाही.
या महामार्गाच्या ठेकेदार कंपन्यांनी वाहनधारकांना उपलब्ध करून दिलेले रस्ते भयावह स्वरूपाचे आहेत. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे. अनेकवेळा वाहने या खड्ड्यांत अडकून वाहतुकीचा बट्ट्याबोळ होतो. खड्ड्यांमध्ये आदळून-आपटून वाहनधारकांचे रोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या सेवा रस्त्यांवर ठिकठिकाणी दलदल निर्माण झाल्याने प्रवास करणारी वाहने राडेराड होताना दिसत आहेत.
या महामार्गाच्या कामातील दिरंगाई आणि सेवा रस्त्यांची दुरवस्था याबद्दल या भागातील नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर या कामाची गती काही काळ वाढल्याचे दिसत होते. त्याचप्रमाणे ठेकेदार कंपन्यांनी पंधरा दिवसांच्या आत सेवा रस्त्यांची दुरवस्था कमी करण्याची हमी दिली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा हे रुंदीकरणाचे काम ठप्प झालेले दिसत आहे. काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाची कामे तेवढी सुरू असलेली दिसतात. त्यामुळे निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण होण्याची सूतराम शक्यता दिसत नाही.